WPL 2026: मुंबई इंडियन्सनं चाखली विजयाची चव, आरसीबीवर 15 धावांनी मात

बडोदा येथील कोटांबीमधील बीसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या वुमन्स प्रीमियर लीग 2026 च्या 16व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने टेबल-टॉपर रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुविरुद्ध थरारक विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत मुंबईने 20 षटकांत 4 बाद 199 धावांचा डोंगर उभा केला आणि नंतर आरसीबीला 20 षटकांत 9 बाद 184 धावांपर्यंत रोखत सामना 15 धावांनी जिंकला.

मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात सजीवन सजना लॉरेन बेलच्या गोलंदाजीवर बाद झाली. मात्र त्यानंतर हेली मॅथ्यूज आणि नैट सायव्हर-ब्रंट यांनी डाव सावरत अप्रतिम भागीदारी केली. दोघींनी 100 हून अधिक धावांची भागीदारी करत आरसीबीच्या गोलंदाजांवर दबाव आणला. मॅथ्यूज अर्धशतक झळकावून बाद झाली, पण सायव्हर-ब्रंटने आपली आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली.

नैट सायव्हर-ब्रंटने शतक ठोकत इतिहास रचला. WPL च्या इतिहासातील पहिले शतक करणारी खेळाडू ठरण्याचा मान तिने मिळवला. यापूर्वी या स्पर्धेतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या 99 होती. शेवटच्या षटकांत हरमनप्रीत कौरनेही उपयुक्त 20 धावांची खेळी केली ज्यामुळे मुंबईने 199 धावांचा भक्कम स्कोअर उभारला.

200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना RCB ची सुरुवात अत्यंत खराब झाली. अवघ्या 31 धावांतच संघाचे चार फलंदाज तंबूत परतले. सहाव्या षटकात राधा यादव बाद झाली, तर 12व्या षटकात नादिन डी क्लर्क (28) माघारी परतली. मात्र ऋचा घोषने एककी झुंज देत सामना रंगतदार केला. तिने 50 चेंडूत 90 धावांची जबरदस्त खेळी साकारली, पण तिला अन्य फलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही.

अखेर आरसीबीला 20 षटकांत 184 धावांवर समाधान मानावे लागले. या विजयासह मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत आपले स्थान अधिक भक्कम केले, तर नैट सायव्हर-ब्रंटचा हा ऐतिहासिक शतकवीर डाव WPL 2026 मधील अविस्मरणीय क्षण ठरला.

Comments are closed.