मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाचा ऐतिहासिक पराक्रम; WPL मध्ये ‘अशी’ कामगिरी करणारी ठरली पहिलीच खेळाडू!
महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामातील (WPL 2026) 10 व्या सामन्यात युपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा 22 धावांनी पराभव केला. मात्र, या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या अमेलिया केरने अशी कामगिरी केली, जी टूर्नामेंटच्या इतिहासात आजवर कोणालाही जमली नव्हती. तिने गोलंदाजीत 3 बळी घेतले आणि फलंदाजीत 49 धावांची नाबाद खेळी केली.
प्रथम फलंदाजी करताना युपी वॉरियर्सने धमाकेदार सुरुवात केली होती. मेग लॅनिंग (70) आणि फोबी लिचफिल्ड (61) यांच्यातील शतकी भागीदारीनंतर युपीचा संघ 220-230 धावांपर्यंत सहज पोहोचेल असे वाटत होते. परंतु, मुंबईने शेवटच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली. अमेलिया केरने 4 षटकांत 28 धावा देऊन 3 बळी घेतले, विशेष म्हणजे तिने हे तिन्ही बळी डावाच्या शेवटच्या षटकात मिळवले.
दीप्ती शर्माची विकेट घेताच अमेलियाने महिला प्रीमियर लीगमध्ये आपले 50 बळी पूर्ण केले. डब्ल्यूपीएलच्या इतिहासात 50 विकेट्सचा टप्पा गाठणारी ती पहिलीच गोलंदाज ठरली आहे. लक्ष्याचा पाठलाग करतानाही तिने उत्कृष्ट फलंदाजी केली, मात्र ती संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.
मुंबई इंडियन्सची सुरुवात अत्यंत खराब झाली होती, त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजही स्वस्तात बाद झाले. 69 धावांत 5 गडी गमावल्यानंतर अमेलिया केर आणि अमनजोत कौर यांनी डाव सावरला आणि संघाच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. मात्र, 19 व्या षटकात शिखा पांडेने केवळ 3 धावा देत सामना युपीच्या बाजूने झुकवला. अमेलियाने 28 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 49 धावा केल्या.
पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्सने सलग 2 सामने जिंकले होते. मात्र, त्यानंतर संघाने सलग 2 सामने गमावले आहेत. असे असले तरी, मुंबई इंडियन्स गुणतालिकेत (Points Table) दुसऱ्या स्थानावर कायम आहे. संघाने 5 पैकी 2 सामने जिंकले असून 3 सामने गमावले आहेत. मुंबईप्रमाणेच गुजरात जायंट्स आणि युपी वॉरियर्सचेही 4-4 गुण आहेत, पण नेट रन रेटच्या जोरावर मुंबई या दोघांच्याही वर आहे. युपी वॉरियर्स गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असून, त्यांनी 5 पैकी 2 सामने जिंकले आणि 3 गमावले आहेत. गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्सचा संघ सर्वात शेवटच्या स्थानी आहे.
Comments are closed.