कोणालाही जमलं नाही, पण मुंबई इंडियन्सने करून दाखवलं! मोठा विक्रम नोंदवला

इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या 19व्या हंगामातील दुसऱ्या लढतीत मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने आहेत. या लढतीत मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीस पोषक खेळपट्टी असतानाही घेतलेला हा निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे.

या लढतीत मैदानात उतरताच मुंबई इंडियन्सने ऐतिहासिक कामगिरी केली. टी-20 फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये 300 सामने पूर्ण करणारा मुंबई इंडियन्स हा पहिलाच संघ ठरला आहे. आयपीएलमुळे टी-20 क्रिकेटला जागतिक पातळीवर मोठी लोकप्रियता मिळाली असून त्यात मुंबईचा मोठा वाटा आहे. आतापर्यंत 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या या संघाने सातत्याने दमदार कामगिरी केली आहे.

मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये एकूण 278 सामने खेळल्या आहेत, तर उर्वरित 22 सामने त्यांनी चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेत खेळल्या. अशा प्रकारे 300 सामन्यांचा टप्पा त्यांनी गाठला. एकूण टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक लढती खेळणाऱ्या संघांच्या यादीत पाकिस्तान आणि समरसेटनंतर मुंबईचा क्रमांक लागतो. ही कामगिरी संघाच्या सातत्यपूर्ण खेळाची साक्ष देणारी आहे.

या हंगामात मुंबई इंडियन्सकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मागील दोन हंगाम संघासाठी निराशाजनक ठरले होते, त्यामुळे यंदा जोरदार पुनरागमन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. हार्सदिक पांड्या सलग तिसऱ्या हंगामात कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळत असून त्याच्यावर मोठा विश्वास व्यक्त केला जात आहे. संघात फारसे बदल न करता काही युवा भारतीय खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

तसेच रोहित शर्मा याची कामगिरीही या हंगामात निर्णायक ठरणार आहे. मागील हंगामात त्याला अपेक्षित यश मिळाले नव्हते, त्यामुळे यंदा त्याच्याकडून मोठ्या धावांची अपेक्षा आहे.

300व्या लढतीचा ऐतिहासिक टप्पा गाठताना मुंबई इंडियन्स विजयी सुरुवात करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा टप्पा संघासाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे.

Comments are closed.