मुंबई इंडियन्सच्या संघाचे नाव बदलणार? 700 कोटींच्या डीलनंतर घेतला निर्णय, रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
मुंबई इंडियन्स फ्रँचायझी परदेशातही भरपूर पैसे गुंतवत आहे. काही आठवड्यांपूर्वी, एमआय फ्रँचायझीने द हंड्रेड लीगच्या ओव्हल इनव्हिन्सिबल्स संघात 49टक्के हिस्सा खरेदी केला. आता एका मीडिया रिपोर्टमध्ये असे उघड झाले आहे की ओव्हल इनव्हिन्सिबल्स ‘एमआय लंडन’ म्हणून ओळखले जाईल. पुढील हंगामापासून हे नवीन नाव लागू होईल. ओव्हल इनव्हिन्सिबल्स हा सहावा संघ बनला आहे ज्याची मालकी मुंबई इंडियन्सकडे आहे.
द टेलिग्राफनुसार, 2026च्या द हंड्रेड हंगामापूर्वी ओव्हल इनव्हिन्सिबल्सचे नाव ‘एमआय लंडन’ असे बदलले जाईल. 2025च्या हंगामाच्या सुरुवातीपूर्वी, द हंड्रेड संघांमध्ये किमान 49 टक्के हिस्सेदारीसाठी बोली लावण्यास सुरुवात झाली. यापैकी एमआय फ्रँचायझीने ओव्हल इनव्हिन्सिबल्स संघासाठी बोली लावली होती, ज्याचे मूल्यांकन 123 दशलक्ष पौंड असल्याचे सांगितले जात होते. मुंबई इंडियन्सने 49 टक्के हिस्सा खरेदी केल्यामुळे, त्यासाठी त्यांना 60 दशलक्ष पौंडांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील. जे भारतीय चलनात 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल.
ओव्हल इनव्हिन्सिबल्समध्ये आता मुंबई इंडियन्सचा 49 टक्के हिस्सा आहे, उर्वरित 51 टक्के हिस्सा अजूनही सरे काउंटी क्लबकडे आहे. द टेलिग्राफच्या अहवालानुसार, सरेला ओव्हल इनव्हिन्सिबल्सचे नाव हवे होते, तरीही पुढील हंगामापासून संघाचे नाव एमआय लंडन असे बदलले जाईल.
मुंबई इंडियन्स फ्रँचायझीकडे आता जगभरात एकूण 6 संघ आहेत. मुंबई इंडियन्सचा संघ बीसीसीआयद्वारे चालवल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) मध्ये खेळतो. अमेरिकेच्या मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) मध्ये मुंबई इंडियन्सकडे एमआय न्यू यॉर्क आहे. याशिवाय, दक्षिण आफ्रिकेच्या एसए20 मध्ये एमआय केप टाउन, इंटरनॅशनल लीग टी20 (आयएलटी20) मध्ये एमआय एमिरेट्स आणि इंग्लंडच्या द हंड्रेड लीगमध्ये ओव्हल इनव्हिन्सिबल्स, हे सर्व एमआय फ्रँचायझीच्या मालकीचे आहेत.
Comments are closed.