DC vs MI: मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पराभव का झाला? कर्णधार सूर्याने सांगितलं 'हे' मोठं कारण
मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 19 व्या हंगामाची सुरुवात दणक्यात केली होती, त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यातही त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, मुंबईला या सामन्यात यश आले नाही आणि 6 विकेट्सनी एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 162 धावा केल्या होत्या, ज्याचा पाठलाग दिल्लीने 18.1 षटकांत 4 विकेट्स गमावून पूर्ण केल्या. हार्दिक पांड्याच्या जागी कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) या पराभवासाठी खराब फलंदाजीला जबाबदार धरले आहे.
सामन्यानंतर बोलताना सूर्या म्हणाला, मला वाटतं ही खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती. दुसऱ्या डावात ती थोडी धिमी होईल अशी आमची अपेक्षा होती. तरीही, फलंदाजीच्या दृष्टीने विचार केला तर आम्ही 15 ते 20 धावा कमी केल्या, जे पराभवाचे मुख्य कारण ठरले. पण यासाठी मी दिल्लीच्या गोलंदाजांचे श्रेय कमी करणार नाही, त्यांनी उत्तम गोलंदाजी केली. तसेच समीर रिझवीने ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्यानंतर आम्हाला पुनरागमनाची संधीच मिळाली नाही.
या सामन्यात सूर्याने 51 धावांची खेळी केली, पण तो मोक्याच्या क्षणी बाद झाला. त्याबद्दल तो म्हणाला, “मी आणि नमन 16 व्या आणि 18 व्या षटकात चुकीच्या वेळी बाद झालो. जर आम्ही टिकलो असतो, तर किमान 180 ते 185 धावा झाल्या असत्या आणि या खेळपट्टीवर ती धावसंख्या पुरेशी ठरली असती. खेळात कधीकधी असे दिवस येतात. मला खात्री आहे की आम्ही या पराभवातून सावरून पुढच्या सामन्यात जोरदार पुनरागमन करू.
Comments are closed.