राजस्थानविरुद्ध हार्दिक पांड्या खेळणार का नाही?मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून मोठी अपडेट समोर
आयपीएल 2026 मध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स (MI) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात महत्त्वाचा सामना रंगणार आहे. हा सामना बरसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबई संघासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या पूर्णपणे फिट झाला असून तो राजस्थानविरुद्धच्या सामन्यात खेळणार असल्याची माहिती बॉलिंग कोच पारस म्हाम्ब्रे यांनी दिली आहे.
हार्दिक पांड्या दिल्लीविरुद्धच्या मागील सामन्यात आजारपणामुळे खेळू शकला नव्हता. त्या सामन्यात मुंबईला दिल्ली कॅपिटल्सकडून सहा विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता. हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने संघाची धुरा सांभाळली होती. मात्र आता हार्दिकच्या पुनरागमनामुळे संघाला मोठी ताकद मिळणार आहे.
प्रेस कॉन्फरन्समध्ये पारस म्हाम्ब्रे म्हणाले की, “हार्दिक पांड्या जखमी नव्हता, तो फक्त अस्वस्थ होता. आता तो पूर्णपणे फिट असून पुढील सामन्यासाठी उपलब्ध आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, हार्दिक नसतानाही संघाने परिस्थितीनुसार चांगला खेळ करण्याची क्षमता दाखवली आहे.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईने ट्रेंट बोल्ट ऐवजी कॉर्बिन बॉशला संधी दिली होती. याबाबत विचारले असता म्हाम्ब्रे यांनी सांगितले की, हार्दिक उपलब्ध नसल्यामुळे संघरचनेत बदल करणे गरजेचे होते. ऑलराउंडरच्या भूमिकेसाठी योग्य पर्याय म्हणून हा टॅक्टिकल निर्णय घेतला गेला.
दरम्यान, हार्दिकने राजस्थानविरुद्धच्या सामन्यापूर्वी सराव सत्रात जोरदार तयारी केल्याचे दिसून आले. फिजिओ नितीन पटेल यांच्या देखरेखीखाली त्याने गोलंदाजी करताना चांगल्या वेगात यॉर्कर्स टाकले. तसेच, फलंदाजी कोच कायरन पोलार्ड यांच्या उपस्थितीत त्याने फलंदाजीचाही सराव केला. सरावात तो उत्तम लयीत दिसून आला.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत दोन सामन्यांत एक विजय आणि एक पराभव नोंदवला असून ते गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत. आता हार्दिकच्या पुनरागमनामुळे राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मुंबईकडून अधिक दमदार प्रदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments are closed.