केकेआरविरुद्ध मैदानात उतरताच मुंबईच्या नावावर खास रेकॉर्ड! आयपीएलमध्ये 'अशी' कामगिरी करणारी ठरेल पहिलीच फ्रॅंचायजी
आयपीएल २०२६ च्या हंगामाचा दुसरा सामना रविवारी (२९ मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जाणार आहे. त्यावेळी मैदानात उतरताच मुंबईच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला जाणार आहे. मुंबईने मागील १८ हंगामात अनेक चढ उतार करत पाच विजेतेपद जिंकले आहेत. आता ते आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिलाच संघ ठरणार आहे. कोणता विक्रम ते जाणून घेऊ.
मुंबई ३०० टी२० सामने खेळणारा पहिला फ्रॅंचायजी संघ ठरणार आहे. आजच्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर मुंबई ही ऐतिहासिक कामगिरी करणार आहे. टी२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केवळ दोन संघांनी केली आहे. आता त्या यादीत मुंबईचा समावेश होणार आहे. पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लिश काउंटी संघ सोमरसेट काउंटी क्रिकेट क्लब यांनी प्रत्येकी ३०३ टी२० सामने खेळले आहेत.
यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई त्यांच्या आयपीएल विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत. संघाने २०२० मध्ये शेवटचे आयपीएल विजेतेपद पटकावले होते. हे सर्व विजेतेपद मुंबईने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जिंकले होते.
सध्या मुंबईचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे असून संघात अनेक उत्तम खेळाडूंचा भरणा आहे. त्यामध्ये जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव , तिलक वर्मा हे असून ते नुकत्याच जिंकलेल्या टी२० विश्वचषकाचा भाग राहिले आहेत. रोहित शर्माही संघात असून तो पुनरागमन करण्यासाठी बरीच मेहनत घेत आहे.
आजच्या सामन्यात मुंबई विल जॅक्स आणि मिचेल सॅंटनर यांच्याशिवाय खेळणार आहे. दुसरीकडे केकेआरला दुखापतीने घेरले आहे. त्यामुळे त्यांना संघात अनेक बदल करावे लागले आहेत. अशात दोन्ही संघ कशी सुरूवात करणार, याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.
सर्वाधिक टी२० सामने खेळणारे संघ
पाकिस्तान नॅशनल क्रिकेट असोसिएशन – 303
सॉमरसेट काउंटी क्रिकेट क्लब – 303
मुंबई इंडियन्स – २९९
हॅम्पशायर काउंटी क्रिकेट क्लब – 296
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – २८७
Comments are closed.