19 वर्षे वाट पाहूनही पदरी अन्याय…मग बॉम्बस्फोट केले कुणी? हे प्रशासनाचे अपयश; बॉम्बस्फोट पीडितांचा संताप

मुंबईतील 7/11च्या रेल्वे बॉम्बस्फोटांतील आरोपी आज निर्दोष सुटले. त्यानंतर या बॉम्बस्फोटांतील पीडितांनी दुःख आणि संताप व्यक्त केला. 19 वर्षे वाट पाहून आज पदरी निराशा पडली. सर्वच्या सर्व आरोपी निर्दोष सुटले. मग बॉम्बस्फोट केले कुणी, असा संतप्त सवाल त्यांनी केला. 187 लोकांचे बळी घेणाऱया भीषण बॉम्बस्फोटांतील आरोपी पुराव्याअभावी निर्दोष सुटतात हे प्रशासनाचे अपयश आहे, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

– माझी मुलगी बोरिवलीत घरी परतायला उभी असताना बॉम्बस्फोटात ती गेली. आरोपींना फाशी कधी होईल त्याची वाट पाहत होतो. फाशी झाली की तिथे जाऊन श्रद्धांजली वाहणार होतो, पण आजच्या निर्णयाने प्रचंड मोठा धक्का बसलाय.

– रेल्वे बॉम्बस्फोटात पाय गमावलेले हंसराज कनौजिया यांना आज प्रतिक्रिया देताना अश्रू आवरले नाहीत. 19 वर्षे न्यायाकडे आस लावून बसलो होतो की, आरोपींना फाशी होईल; पण आज पदरी अन्याय, अन्याय आणि अन्याय पडला. प्रशासनालाच माहीत नाही की, आरोपी कोण आणि निर्दोष कोण? प्रशासन फेल गेले. आता सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाऊन तरी न्याय द्यावा, असे कनौजिया म्हणाले.

– 2006 ला बॉम्बस्फोट झाले. 19 वर्षे उलटली; बॉम्बस्फोटात हात गमावल्यावर झालेला आघातापेक्षा आरोपी निर्दोष सुटल्याचा आघात शंभर पट जास्त आहे. 12 जण पकडले जातात, केस चालते मात्र उच्च न्यायालयात आरोपी निर्दोष सुटतात. मग बॉम्बस्फोट केले कुणी? हे प्रशासनाने अपयशच आहे. न्यायासाठी सर्वोच्च न्यायालयात जावेच लागेल, असे बॉम्बस्फोटात डावा हात गमावलेल्या महेंद्र पितळे यांनी दिली.

Comments are closed.