उद्या पश्चिम आणि मध्य मार्गावर मेगा ब्लॉक, वेळापत्रक पाहून घराबाहेर पडण्याचे आवाहन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई लोकलने प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेकडून कांदिवली ते बोरीवली दरम्यान ब्रिज क्रमांक 61 च्या पुनर्बांधणी कामासाठी मोठा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक 28 मार्च रोजी रात्री 22:30 वाजल्यापासून 29 मार्च रोजी सायंकाळी 19:30 वाजेपर्यंत अप आणि डाउन स्लो मार्गावर असेल. तसेच 29 मार्च रोजी पहाटे 01:00 ते 04:30 या वेळेत डाउन फास्ट मार्गावरही ब्लॉक घेतला जाणार आहे.

या कालावधीत स्लो मार्गावरील सर्व गाड्या गोरेगाव ते बोरीवली दरम्यान फास्ट मार्गावर वळवण्यात येतील. तर डाउन फास्ट मार्गावरील ब्लॉकदरम्यान अंधेरी ते बोरीवलीदरम्यान पाचव्या मार्गावर गाड्या चालवल्या जाणार असल्याने राम मंदिर, मालाड आणि कांदिवली स्थानकांवर डाउन दिशेच्या गाड्या थांबणार नाहीत. तसेच या ब्लॉकदरम्यान बोरीवली स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वर कोणतीही गाडी हाताळली जाणार नाही.

यामुळे अनेक उपनगरी गाड्या रद्द राहणार असून काही गाड्या अंधेरी आणि गोरेगाव पर्यंतच धावणार आहेत. प्रभावित गाड्यांची सविस्तर यादी सर्व स्थानकांच्या स्टेशन मास्टर कार्यालयात उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, मध्य रेल्वेकडूनही रविवारी देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाउन स्लो मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 या वेळेत ब्लॉक असेल. या काळात स्लो लोकल गाड्या फास्ट मार्गावर वळवल्या जाणार असून प्रवासात सुमारे 20 मिनिटांपर्यंत उशीर होऊ शकतो.

तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरुळ (ठाणे–पनवेल मार्गासह) या दरम्यान सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 या वेळेत सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. मात्र खारकोपर–उरण मार्गावरील तसेच सीएसएमटी–वाशी आणि पनवेल गाड्या नियमित वेळापत्रकानुसार चालू राहतील. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.

Comments are closed.