युवकाने विधानभवनबाहेर अंगावत ओतलं केरोसीन, पोलिसांनी घेतलं ताब्यात, धाराशिवमध्येही तोच प्रकार
मुंबई: अधिवेशन काळात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपल्या समस्या, तक्रारी आणि अडचणी घेऊन नागरिक मुंबईतील (Mumbai) मंत्रालय आणि विधानभवन परिसरात येत असतात. आपल्या प्रश्नांवरील उत्तर मुंबईत मिळेल, अशी आशा ठेऊन नागरिक आमदार-खासदार आणि शासन दरबारी प्रयत्न करतात. मात्र, निराशा झाल्यानंतर आक्रमक पवित्रा घेत आपला संताप व्यक्त करतात. आज विधानभवन परिसरात दादासो बाबन कळसाईत (वय 38 वर्षे, रा. टाकळी, ता. माढा, जि. सोलापूर) या व्यक्तीने अंगावर केरोसीन ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी (Police) तत्काळ हस्तक्षेप करून त्याला पकडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, धाराशिवमध्येही जिल्हाधिकारी कार्यालयात अशाच प्रकारची घटना घडली आहे.
विधानभवन परिसरातील उषा मेहता चौकात ही घटना घडली असून पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, संवेदनशील आणि सायलंट झोन परिसर असलेल्या विधानभवन परिसरात वारंवार अशा घटना घडत असल्याने पोलिसांच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, सदर व्यक्तीला पुढील चौकशीसाठी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी गावाकडील नगरपंचायतीने लोहार समाजाच्या जागेवर अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेला भगवान विश्वकर्मा यांचा पुतळा हटवला होता. त्या घटनेमुळे तो नाराज असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 226 अंतर्गत अदखलपात्र (Non-Cognizable) गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
धाराशिवमध्येही अंगावर पेट्रोल ओतून घेतलं
धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घालत जागर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी बैठक घेत असलेल्या सभागृहाबाहेर कार्यकर्त्यांनी घोषणा देण्याचा प्रयत्न केला. सभागृहात जाण्यापासून रोखल्याने कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी, अंगावर पेट्रोल ओतून घेत एका कार्यकर्त्याने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तात्काळ आंदोलकास ताब्यात घेत बाजूला नेले. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. आंदोलनामुळे जिल्हाधिकारी यांचा पारा चढला, त्यानंतर आंदोलन व माध्यम प्रतिनिधींना जिल्हाधिकारी यांनी केबिनच्या बाहेर काढले होते. राज्य शासनाकडून गडकोट विकास महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी जागर प्रतिष्ठानच्या वतीने तुळजापूरात सात दिवसापासून सुरू आहे. गेल्या 7 दिवसांपासून आमरण उपोषण असतानाही, उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घातला.
Comments are closed.