वांद्रे येथील लिंक स्क्वेअर मॉलच्या इमारतीत भीषण आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल

वांद्रे येथील लिंकिंग रोडवरील तीन मजली व्यावसायिक संकुल लिंक स्क्वेअर मॉलच्या तळघरात असलेल्या क्रोमा शोरूममध्ये मंगळवारी पहाटे 4.10 वाजण्याच्या सुमारास आग लागली. मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. ही घटना मुंबईत दोन दिवसांत पहाटे लागलेली दुसरी मोठी आग आहे. रविवारी, बॅलार्ड इस्टेट परिसरातील अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालय असलेल्या इमारतीत मोठी आग लागली होती.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना सुरुवातीला सकाळी 4.17 वाजता लेव्हल 1 आग म्हणून जाहीर करण्यात आली. ती पहाटे 4.28 वाजेपर्यंत लेव्हल 2 पर्यंत वाढली आणि पहाटे 4.49 वाजता लेव्हल 3 आग घोषित करण्यात आली. आग सुरुवातीला शोरूमच्या तळघरापर्यंत मर्यादित होती. मात्र, तळघर, पहिला तळमजला आणि तीन मजल्यांवर दाट धूर पसरला. त्यामुळे दृश्यमानतेत अडथळा निर्माण झाल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी अडचणी येत आहेत.
आग विझविण्यासाठी 12 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलिस, अदानी इलेक्ट्रिसिटी, सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) आणि स्थानिक वॉर्ड कर्मचाऱ्यांसह अनेक एजन्सींनी आपत्कालीन परिस्थितीत मदत केली. एक विभागीय अग्निशमन अधिकारी (डीएफओ), दोन सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी (एडीएफओ), तीन वरिष्ठ स्टेशन अधिकारी (वरिष्ठ एसओ) आणि तीन स्टेशन अधिकारी (एसओ) घटनास्थळी दाखल झाले आहेत. तैनात करण्यात आलेल्या वाहनांमध्ये 12 अग्निशमन इंजिन, नऊ जंबो वॉटर टँकर, दोन श्वसन उपकरण व्हॅन, एक बचाव व्हॅन आणि एक पाण्याचा जलद प्रतिसाद वाहन यांचा समावेश होता. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी 108आपत्कालीन रुग्णवाहिका देखील तैनात करण्यात आली होती.
Comments are closed.