मुंबईसह राज्यात दुकाने, मॉल, हॉटेल 24 तास खुली राहणार

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मांडलेली संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे. मुंबईसह राज्यातील दुकाने, मॉल, हॉटेल्स, सिनेमागृहे, नाटय़गृहे आणि मनोरंजनाची व करमणुकीची ठिकाणे आता चोवीस तास खुली ठेवता येणार आहेत. तसा शासन आदेश आज जारी करण्यात आला. बार, परमिटरूम, पंट्री लिकर बारना यातून वगळण्यात आले असून त्यांच्या वेळा पूर्वीप्रमाणेच असतील.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सर्वप्रथम ही संकल्पना मांडली होती. दुकाने-आस्थापना रात्रीही सुरू ठेवण्याची सशर्त परवानगी द्यावी, असे त्यांचे म्हणणे होते. तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या भाजपने या संकल्पनेवर टीका केली होती. आता भाजप सरकारनेच या संकल्पनेची उपयुक्तता लक्षात घेऊन त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
मद्याची दुकाने आणि इतर आस्थापनांमध्ये गल्लत होत असल्याने पोलिसांकडून इतर दुकानेही रात्रीची खुली ठेवण्यास प्रतिबंध केला जात होता. त्यामुळे अधिक स्पष्टता आणण्यासाठी हा आदेश काढण्यात आला. यानुसार महाराष्ट्र दुकाने व आस्थपना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनिय 2017च्या कलम2(2)मध्ये दिवसाची व्याख्या – मध्यरात्रीपासून सुरू होणारा चोवीस तासांचा कालावधी, अशी करण्यात आली आहे.
आस्थापने आठही दिवस सुरू ठेवता येणार
उद्योग विभागाने या निर्णयाचा शासन आदेश जारी केला आहे. त्या आदेशातील काही कलमांच्या अंतर्गत आस्थापना आठवडय़ातील सर्व दिवस व्यवसाय करण्यासाठी खुल्या ठेवता येणार आहेत. मात्र त्यासाठी अट घालण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचाऱयास आठवडय़ातून चोवीस तास सलग विश्रांती मिळेल अशी साप्ताहिक सुट्टी देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Comments are closed.