मोनो बंद पडली, एका बाजूला झुकली; काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढले

एकीकडे मुसळधार पावसाने मुंबईकरांचे हाल केले असतानाच दुसरीकडे मोनोरेलच्या मार्गावर प्रवाशांना जीवघेणा थरार अनुभवायला मिळाला. चेंबूर ते भक्तीपार्कदरम्यानच्या मार्गात तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल मधेच बंद पडली. वीजपुरवठा खंडीत झाल्याने बंद पडलेल्या मोनोरेलमध्ये 100 हून अधिक प्रवासी सवा तास अडकले होते. गाडीतील एसी बंद असल्याने त्या प्रवाशांची घुसमट झाली. अखेर पालिकेच्या अग्निशमन दलाने धाव घेतली आणि मोनोच्या काचा फोडून प्रवाशांना क्रेनच्या मदतीने खाली उतरवले.

मंगळवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चेंबूरहून संत गाडगे महाराज चौक स्थानकाकडे चाललेली मोनोरेल अचानक तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. त्याचदरम्यान चेंबूरकडे चाललेली ट्रेन त्याच मार्गिकेसमोर आली होती. या गोंधळात 100 हून अधिक प्रवासी मोनोरेलमध्ये अडकले होते. काही प्रवाशांनी मदतीसाठी पालिकेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधला. त्यानंतर पालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तीन स्नोर्केल वाहनांच्या साहाय्याने मदतकार्य सुरु करण्यात आले. यात सव्वातास गेल्याने मोनोरेलमधील प्रवाशांची घुसमट झाली.

प्रवाशांचा जीव टांगणीला

बंद पडलेल्या मोनोरेलमध्ये व्हेंटिलेशनची समस्या निर्माण झाली होती. त्यात प्रवाशांना गुदमरल्याचा त्रास झाला. गाडीतील लाईट काही वेळाने बंद झाल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. मोनोरेलमध्ये कोणीही तंत्रज्ञ नसतो. अशा परिस्थितीत दुर्घटना घडून जिवीतहानी झाल्यास सरकार त्याची जबाबदारी घेणार का, असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला.

Comments are closed.