मुंबईच्या महापौरांना मोदींसारखी ‘व्हीव्हीआयपी’ ट्रीटमेंट; गाडीवरच्या लाल दिव्यामुळे रितू तावडे वादात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखी व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट मिळतेय अशी चर्चा सुरू झाली आहे. आपल्या नव्या कोऱया गाडीवर लाल दिवे लावल्यामुळे रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. दिवसाही त्या लाल दिवे लावून फिरत असल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

केंद्र सरकारने 2017 पासून बहुतांश सरकारी वाहनांवर लाल दिवा लावण्यास मनाई केली आहे. केवळ पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासह निवडक व्हीव्हीआयपींच्या गाडीवरच लाल दिवे लावता येऊ शकतात. महापौर रितू तावडे यांच्याकडून त्याचे पालन केले जात नाही. ‘मुंबईचा शिवसैनिक’ नावाच्या एका सोशल मीडिया अकाऊंटवर महापौर तावडे यांच्या गाडीचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. त्यात त्यांच्या कारच्या दर्शनी भागात लाल निळे फ्लॅश लाईट्स लावण्यात आल्याचे दिसत आहे. शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर यांनीही ही पोस्ट शेअर करत, नवनिर्वाचित महापौरांच्या विरोधात नक्की काय चाललंय, असा सवाल उपस्थित केला आहे.

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा महापौर मोठय़ा झाल्या च्या?

पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौरांवर निशाणा साधला. ‘नियमांना ब्रेक आणि महापौरांच्या गाडीला झगमगाट, मुंबईत व्हीआयपी संस्कृतीची पुन्हा एण्ट्री? दोन दिवसांपूर्वीच महापौर मॅडम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या जीआरला, दिलेल्या सूचनेला हरताळ फासला. आता केंद्र सरकारच्या निर्णयाला हरताळ फासला. व्हीआयपी संस्कृती पंतप्रधान मोदी, केंद्र सरकार यांनी संपवली होती, पण महापौरांना व्हीआयपी संस्कृतीचा मोह टाळता आला नाही. महापौर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठय़ा झाल्या का, असा सवाल पेडणेकर यांनी ट्विटद्वारे केला.

अधिकाऱयांकडून सारवासारव

महापौरांच्या गाडीवर लाल निळे दिवे लावण्यात आले होते अशी कबुली महानगरपालिका अधिकाऱयांनी दिली आहे. तसेच दोन दिवसांपूर्वीच ते दिवे काढून टाकण्यात आल्याची सारवासारवही त्यांनी केली. सध्या महापौरांच्या गाडीवर कोणतेही विशेष दिवे नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Comments are closed.