मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई! बिगुल वाजला!! मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी

राज्यातील मागील साडेतीन-चार वर्षांपासून रखडलेल्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डेंबिवली, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूरसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल अखेर आज वाजला. मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह राज्यातील एकूण 2 हजार 869 जागांसाठी 15 जानेवारीला मतदान घेण्यात येणार आहे. 16 जानेवारीला मतमोजणी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज केली. केंद्रातील भाजप सरकारकडून मुंबई व महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचे सुरू असलेले प्रयत्न. तसेच राज्यात तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याचा सुरू असलेला राज्य सरकारचा उद्योग आणि मुंबई व राज्यातील एकंदर राजकीय परिस्थिती पाहता ही निवडणूक म्हणजे मराठी माणसाच्या अस्तित्वाची खरी लढाई ठरणार आहे.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत महानगरपालिका निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा केली. यावेळी आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून मुंबईसह राज्यातील सर्व 29 महानगरपालिका क्षेत्रात सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केली. सर्व महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त वाघमारे यांनी दिली.

मुंबई पालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यावयाचा असल्याने प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावे लागेल. उर्वरित सर्व 28 पालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणतः चार जागा असतील. काही पालिकांच्या काही प्रभागांत तीन अथवा पाच जागा असतील. मुंबई वगळता अन्य सर्व पालिका निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराने किमान 3 ते 5 मते देणे अपेक्षित असेल.

जातवैधता पडताळणी

राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱया उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, परंतु जातवैधता प्रमाणपत्र जोडले नसल्यास जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अर्ज केल्याचा पुरावा देणे आवश्यक राहील. सहा महिन्यांच्या कालावधीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यात येईल,’ असे हमीपत्रदेखील संबंधित उमेदवारांना द्यावे लागेल. निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवाराची निवड रद्द होईल, असे आयुक्त वाघमारे यांनी स्पष्ट केले.

आचारसंहिता

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित पालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासनाला महानगरपालिका कार्यक्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना आचारसंहितेची आडकाठी असणार नाही.

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांनाही मतदान केंद्रावर जावे लागणार

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांच्या घरी मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील बहुसदस्य प्रभाग पद्धती लक्षात घेता ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर जाऊनच मतदान करावे लागेल, असे वाघमारे यांनी स्पष्ट केले. मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, ताह्याबाळासह असणाऱया स्त्रिया, गरोदर स्त्रिया आदींना मतदानासाठी प्राधान्य दिले जाईल. व्हिलचेअरचीही व्यवस्था असेल. मतदान पेंद्रावर विजेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची, सावलीची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

13 जानेवारीला प्रचार बंद; जाहिरातींना बंदी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचार समाप्तीसंदर्भात अधिनियमांमध्ये वेगवेगळय़ा तरतुदी आहेत. महानगरपालिका निवडणुकांत मतदानाच्या 48 तास अगोदर म्हणजे 13 जानेवारीला सायंकाळी 5.30 वाजता प्रचार बंद होईल. त्यानंतर प्रचारांच्या जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारणसुद्धा करता येणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

गुलाबी मतदान केंद्र

महिला मतदारांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी ‘पिंक मतदान केंद्र’ म्हणून ओळखले जाईल. या ठिकाणी सर्व निवडणूक अधिकारी-कर्मचारी व पोलीस कर्मचारी महिला असणार आहेत.

नागपूर व चंद्रपूर पालिका निवडणुका न्यायालयाच्या निकालाच्या अधीन

नागपूर व चंद्रपूर महानगरपालिकांमध्येही आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्यावर गेली आहे. या ठिकाणी निवडणुका घेण्यात येत असल्या तरी न्यायालयाचा निर्णयाच्या अधीन राहूनच तेथील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

‘मताधिकार’ मोबाईल अॅप

पालिका निवडणुकांसाठीच्या मतदार यादीतील मतदाराचे नाव, मतदान केंद्र आणि उमेदवारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘मताधिकार’ हे मोबाईल अॅप उपलब्ध करून दिले आहे. मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळदेखील उपलब्ध करून दिले आहे.

मालवणमधील तक्रारीची इन्कम टॅक्सकडून चौकशी

मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीत पैशाचे वाटप झाल्याची तक्रार नीलेश राणे यांनी केली आहे. स्टिंग ऑपरेशन करून भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात लाखो रुपये सापडल्याचे दाखवून दिले आहे. याबाबत निवडणूक आयोगाने काय कारवाई केली, असा प्रश्न केला असता आयुक्त वाघमारे यांनी जी रोख रक्कम सापडली ती संबंधितांच्या बेडरूममध्ये सापडली. पैसे वाटप करताना सापडलेले नाहीत. त्यामुळे जी रक्कम सापडली त्याबाबत इन्कम टॅक्स व निवडणूक अधिकारी चौकशी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

रेल्वे, एसटी आणि विमानतळाच्या ठिकाणी भरारी पथकांमार्फत लक्ष

नगरपालिका व नगर परिषदांच्या निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या 29 तक्ररी आल्या. त्यातील 11 तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून 18 तक्रारींची चौकशी सुरू आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये याची योग्य ती दक्षता घेण्यात येत असून रेल्वे स्टेशन, एसटी स्थानक आणि विमानतळ येथे भरारी पथकांमार्फत लक्ष ठेवण्यात येईल. तसेच बँका आणि पतसंस्थांच्या माध्यमातून होणाऱया व्यवहारावरही निवडणूक आयोगाचे लक्ष असणार आहे.

जागा व आरक्षित जागा

  • महानगरपालिकांची संख्या     ः  29
  • एकूण प्रभाग              ः    893
  • एकूण जागा               ः 2,869
  • महिलांसाठी जागा      ः 1,442
  • अनुसूचित जातींसाठी जागा   ः  341
  • अनुसूचित जमातींसाठी जागा ः  77
  • ओबीसी प्रवर्गासाठी जागा      ः  759

उमेदवारांसाठी खर्च मर्यादा

  • मुंबई आणि ‘अ’ वर्ग महापालिका

(पुणे व नागपूर) ः  1 लाख

  • ‘ब’ वर्ग महापालिका

(पिंपरी-चिंचवड, नाशिक व ठाणे)

: 13 लाख

  • 'अ' वर्ग महानगरपालिका

(कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर व वसई-विरार)

: 11 लाख

  • ‘ड’ वर्ग महानगरपालिका

(उर्वरित सर्व 19) ः 9 लाख

प्रचारासाठी मिळणार अवघे 13 दिवस

मुंबई पालिकेसाठी निवडणुकीची अधिसूचना 16 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल, तर उर्वरित सर्व 28 महानगरपालिकांची अधिसूचना 18 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. प्रचारासाठी अवघे 13 दिवसच मिळणार आहेत. 3 जानेवारी रोजी अंतिम उमेदवार यादी आणि चिन्ह वाटप होणार असल्याने त्यानंतरच प्रचारात खरा रंग भरेल.

या महानगरपालिकांत निवडणूक

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, मीरा- भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पिंपरी-चिंचवड, पुणे, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर, सांगली-मिरज-कुपवाड, नागपूर, चंद्रपूर,  अमरावती, अकोला, परभणी, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, जालना.

27 डिसेंबरपर्यंत यादीतील चुका दुरुस्त करता येणार

प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 15 डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाल्या आहेत. मतदान केंद्राची यादी 20 डिसेंबर तर मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 27 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदार याद्यांचे विभाजन करताना एखाद्या इमारतीमधील मतदारांची नावे दुसऱया प्रभागात गेली आहेत. विधानसभेच्या मतदार यादीत नाव आहे, परंतु पालिका निवडणुकीच्या मतदार यादीत नाव नाही, असे आढळून आल्यास 27 डिसेंबरपर्यंत मतदार यादीतील त्या चुका दुरुस्त करता येतील, असे राज्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले.

मराठी माणसा, मुंबई वाचव! जागोजागी लागलेली पोस्टर्स पोलिसांनी रातोरात हटवली

मुंबई महापालिकेची यावेळची निवडणूक मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. त्यामुळे मराठी माणसाची वज्रमूठ आवळली जात असून मराठी माणसाला साद घालणारी पोस्टर्स मुंबईत जागोजागी झळकली. ही पोस्टर्स कुणी लावली हे कुणालाच माहिती नाही. मात्र त्यावर पोलिसांनी तत्परतेने कारवाई केली. अनेक ठिकाणची पोस्टर्स रातोरात हटवण्यात आली.

निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी अर्ज स्वीकारणे  23 ते 30 डिसेंबर

उमेदवारी अर्जांची छाननी  31 डिसेंबर 2025

अर्ज माघारीची मुदत

2 जानेवारी 2026

निवडणूक चिन्ह वाटप

3 जानेवारी 2026

अंतिम उमेदवार यादी

3 जानेवारी 2026

मतदानाची वेळ

सकाळी 7.30 ते

सायंकाळी 5.30

मतदान केंद्र आणि ईव्हीएम

एकूण मतदार

3 कोटी 48 लाख

78 हजार 17

मतदान केंद्र

39 हजार 147

ईव्हीएम कंट्रोल युनिट

43 हजार 958

बॅलेट युनिट

87 हजार 916

दुबार मतदारांचे काय?

  • मतदार यादीत नावे वगळण्याचा किंवा नव्याने नावे समाविष्ट करण्याची बाब राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही; परंतु त्यातील दुबार नावांबाबत मात्र पुरेपूर दक्षता घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त त्यांच्या स्तरावर कार्यवाही करीत आहेत, असे वाघमारे यांनी सांगितले.
  • मुंबई पालिकेने संभाव्य दुबार मतदारांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र ऑप्लिकेशन विकसित केली आहे. इतरही महानगरपालिकांनी विविध तंत्रांचा वापर करून संभाव्य दुबार नावांबाबत दक्षता घेतली आहे, असे ते म्हणाले.
  • दुबार नावांपुढे स्टार करून त्यांच्याकडून मतदान कुठे करणार याबाबत हमीपत्र भरून घेण्यात येत आहे, परंतु काही कारणाने असा अर्ज भरून घेतला नसल्यास संभाव्य दुबार नाव असलेला मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याची ओळख पटवून त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे हिमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे.

मुंबईत 10 हजार मतदान केंद्रे

मुंबईत 15 जानेवारीला होणाऱया मतदानासाठी पालिकेने जय्यत तयारी केली असून 10 हजार 111 मतदान केंद्रे नियोजित केली आहेत. यामध्ये या केंद्रांसाठी 11 हजार 349 कंट्रोल युनिट आणि 22 हजार 668 बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मुंबईत एकूण 1 कोटी 3 लाख 44 हजार 315 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 2017 मध्ये 91 लाख 80 हजार 497 मतदार होते. त्यात 11 लाख मतदारांची भर पडली आहे. मुंबई महापालिकेने मतदानासाठी गेल्या महिनाभरापासून तयारी सुरू केली आहे. कर्मचाऱयांच्या नियोजनापासून तांत्रिक कामे पालिकेने पूर्ण केली आहेत.

1 जुलै 2025 ची मतदारयादी ग्राह्य

विधानसभेची 1 जुलै 2025 ची मतदार यादी महानगरपालिका निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येईल. या याद्यांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. फक्त पालिका निवडणुकांसाठी त्या प्रभागनिहाय विभाजित करण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली.

उमेदवारी अर्ज ऑफलाइन पद्धतीने

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची सुविधा आहे. मात्र विविध पक्षांची मागणी लक्षात घेऊन महानगरपालिका निवडणुकीत ऑफलाइन पद्धतीनेच नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

Comments are closed.