Mumbai News – एसटीची 10 टक्क्यांची भाडेवाढ रद्द; टीकेची झोड उठताच महायुती सरकारचा निर्णय

ऐन सणासुदीच्या काळात एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री लावण्याच्या निर्णयातून अखेर महायुती सरकारने माघार घेतली आहे. दिवाळीच्या गर्दीच्या हंगामात एसटीच्या विविध बससेवांसाठी लागू केलेली 10 टक्क्यांची तिकीट दरवाढ अखेर रद्द करण्यात आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाडेवाढ रद्दची घोषणा केली आहे.

राज्यावर अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचे गंभीर संकट ओढवले असतानाही दिवाळीच्या तोंडावर एसटीच्या भाडेवाढीचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यावर चौफेर टीका होताच निर्णयाला 24 तास उलटण्याआधीच तो भाडेवाढ रद्द करण्याची घोषणा परिवहन मंत्र्यांनी केली आहे.

15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर यादरम्यान साधी निमआराम, शयन आसनी, शयनयान, वातानुकूलित शिवशाही (आसनी), जनशिवनेरी या बससेवेसाठी ही दरवाढ लागू असेल, असे एसटी महामंडळाने जाहीर केले होते. त्यानुसार संपूर्ण राज्यभरातील एसटी प्रवाशांना जवळपास महिनाभर एसटीच्या प्रवासासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार होते. ही भाडेवाढ रद्द करण्यात आल्याने ग्रामीण भागातील जनतेला पूरस्थिती आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला आहे.

Comments are closed.