एल्फिन्स्टन पूल 10 सप्टेंबरपासून बंद, पुनर्वसनाचा तिढा मात्र कायम

एल्फिन्स्टनचा ब्रिटिशकालीन पूल गणेशोत्सकानंतर 10 सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. याबाबत वाहतूक विभागाकडून आज माहिती देण्यात आली. हा पूल पाडून डबलडेकर पूल उभारण्यात येणार आहे. मात्र, पुलामुळे बाधित होणाऱ्या इमारतींमधील रहिवाशांनी एल्फिन्स्टनमध्येच पुनवर्सनाची मागणी करत पूल पाडण्यास तीव्र विरोध केला असून त्यामुळेच पुलाचे पाडकाम लांबणीवर पडले होते.

अनंत चतुदर्शीनंतर तीन दिवसांनी पूल बंद केला जाईल. सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता हा पूल लवकरात लवकर पाडण्याची आवश्यकता आहे. मात्र, गणेशोत्सवात या भागात वाहतूक कोंडी होईल हे लक्षात घेऊन 10 सप्टेंबरपासून पूल बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे वाहतूक विभागाने म्हटले आहे.

  • अटल सेतूवरून येणा-या वाहनांना थेट वरळी आणि वांद्र्याच्या दिशेने प्रवास करणे सोपे व्हावे यासाठी सव्वाशे वर्ष जुना एल्फिस्टन पूल तोडून एमएमआरडीए डबलडेकर पुलाची उभारणी करणार आहे.
  • परळ, शिवडी, प्रभादेवी, वरळी या भागांसाठी हा पूल अत्यंत महत्त्काचा आहे. केईएम, वाडिया, टाटा अशी प्रमुख रुग्णालये, अनेक कार्पेरेट कार्यालये, शाळा, महाविद्यालये या भागात आहेत. पूल बंद झाल्यास रुग्ण, नोकरदार, विद्यार्थी यांना त्रास सहन करावा लागणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही, रहिवाशी आंदोलन करणार

आधी आमचे योग्य पुनवर्सन करा, त्यानंतरच एलफिन्स्टन पूल तोडा, अशी आमची सुरुवातीपासूनच मागणी आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हा रहिवाशांना दिलेले आश्वासन पाळले नाही. पुनर्कसनासंदर्भात आजवर आम्हाला कोणतीही लेखी हमी दिलेली नाही. पुलामुळे दोन इमारती बाधित होणार असल्या तरी हा प्रश्न पुलालगत असलेल्या 19 इमारतींचा आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर आम्ही 19 इमारतींचे रहिवाशी मिळून आंदोलन वरू. यात सर्व राजकीय पक्ष देखील सहभागी होतील, असे हाजी नुराणी इमारतीचे सचिव मुनाफ ठाकूर यांनी सांगितले.

Comments are closed.