Mumbai News – आधी ब्रेकअप मग पॅचअपचा प्रयत्न, भेटायला बोलावून प्रेयसीवर हल्ला करत प्रियकराने जीवन संपवलं

ब्रेकअपमुळे मानसिक तणावात असलेल्या प्रियकराने प्रेयसीवर भररस्त्यात चाकूहल्ला करून स्वतःचे जीवन संपवले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रेयसीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुंबईतीव लालबाग-काळाचौकी परिसरात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेमुळे लालबाग परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोनू बराय असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.
सोनूचे पीडित तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र प्रेयसीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून आठ-दहा दिवसांपूर्वी दोघांत वाद झाला आणि दोघांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपमुळे सोनू मानिसक तणावात होता. तो दोघांमधील वाद मिटवून समेट घडवण्याचाही प्रयत्न करत होता. यासाठी त्याने शुक्रवारी सकाळी पीडितेला भेटायला बोलावले. यावेळी दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. पाहता पाहता वाद विकोपाला गेला आणि सोनूने पीडितेला मारहाण करत तिच्यावर चाकूहल्ला केला.
जीव वाचवण्यासाठी तरुणी जवळच्या आस्था नर्सिंग होममध्ये पळाली. मात्र सोनूने नर्सिंग होममध्ये घुसून तिच्यावर पुन्हा वार केले. यावेळी नर्सिंग होममधील कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करताच सोनूने स्वतःचा गळा चिरला. दोघांनाही जखमी अवस्थेत केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सोनूला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी काळाचौकी पोलिसात घटनेची नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments are closed.