अटल सेतूवर कारला भीषण अपघात; डंपरच्या धडकेत अक्षरशः चुराडा, तरुण जागीच ठार

अटल सेतूवर भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरची कारला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात कारचा अक्षरशः चुराडा होऊन त्यातील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त कार शिवडीला चालली होती. सचिन हनुमंत खाडे असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून तो कामावरुन घरी परतत होता. सोमवारी रात्री हा भीषण अपघात घडला. कारचा चालक सुदैवाने बचावला.
36 वर्षीय सचिन खाडे हा अटल सेतूवरुन कारने घरी चालला होता. मूळचा सातारा जिल्ह्यातील खटाव-मांडवे येथील रहिवासी असलेला सचिन हा खासगी कंपनीत प्लांट मॅनेजर म्हणून कार्यरत होता. तो प्रवास करीत असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती कार अटल सेतूवरुन थेट खाली पडण्याच्या स्थितीत असतानाच मागून येणाऱ्या भरधाव डंपरची जोरदार धडक बसली. या धडकेत कारचा चुराडा झाला. त्यात सुदैवाने कारचालक बचावला. मात्र आत बसलेल्या सचिनला जोराचा मार लागून तो जागीच ठार झाला. सचिन शिवडी परिसरात राहत होता. त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस अपघाताचा अधिक तपास करत आहेत.
हा अपघात घडण्यापूर्वी मंगळवारी सकाळी वांद्रे-वरळी सागरी सेतूवर भीषण अपघात झाला होता. त्यात एका पोलिस हवालदाराचा मृत्यू झाला. कोस्टल रोड आणि सागरी सेतूच्या कनेक्टिंग पॉईंटजवळ हा अपघात घडला. सागरी सेतूवर भरधाव वेगाने चाललेल्या कारने बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना उडवले. त्यात पोलिस हवालदाराचा जागीच मृत्यू झाला, तर महिला पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाली आहे. दत्तात्रय कुंभार असे अपघाती मृत्यू झालेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Comments are closed.