रात्री जमावाने BMC पथकाला हुसकावलं, आता पालिकेने दादरचा अख्खा कबुतरखाना ताडपत्री टाकून बंद केल
मुंबई दारक काबूटर खाना: मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेने शहरातील कबुतरखान्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. दादर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असणारा कबुतरखाना (कबूटर खाना) पालिकेकडून जमीनदोस्त करण्यात येणार होता. त्यासाठी शुक्रवारी रात्री मुंबई महानगरपालिकेचे (BMC) एक पथक त्याठिकाणी तोडकामासाठी गेले होते. मात्र, काही लोकांनी याठिकाणी एकत्र जमत पालिकेच्या कारवाईला विरोध केला होता. या जमावाने हा रस्ता अडवून धरला होता. त्यामुळे पालिकेच्या पथकाला कबुतरखाना तोडता आला नव्हता. या सगळ्या प्रकारानंतर आता मुंबई महानगरपालिका अधिक आक्रमक झाली असून कारवाईला सुरुवात झाली आहे. (Mumbai News)
शनिवारी संध्याकाळपासून महापालिकेने ताडपत्री लावून संपूर्ण कबूतरखाना बंद केला आहे. स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असूनही प्रशासनाने कारवाई थांबवलेली नाही. याठिकाणी धान्य घालण्यास बंदी घालण्यात आली असून परिसरात फलक लावून सूचना देण्यात आल्या आहेत. कोणी धान्य टाकताना आढळल्यास त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही पालिकेकडून देण्यात आला आहे. दादरमधील कबुतरखान्याच्या भागातील पत्रे आणि इतर गोष्टी हटवण्यात आल्या आहेत. आता याठिकाणी कबुतरांना राहण्यासाठी तयार करण्यात आलेला केवळ एक पिंजरा बाकी आहे. मात्र, आता उर्वरित कबुतरखान्याचे तोडकाम कधी केले जाणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
Mumbai Police: कबुतरांना खायला घालणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
कबुतरखान्याच्या ठिकाणी कबुतरांना (Pigons) खाद्य टाकल्यास 500 रुपये दंड आणि गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आला होता. मात्र, काही नागरिक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. शनिवारी कबुतरांना खायला घातल्याप्रकरणी मुंबईत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. माहीम पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. माहीमच्या एल जे रोडवर कबुतरांना खाद्य घातल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी अनोळखी कार चालकावर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, २७० आणि २७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या मनाईनंतरही दादरच्या कबूतरखान्यात पक्ष्यांना खाद्य घातलं जात असल्याचं समोर आल्यानंतर उच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला होता. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेला पालिकेला देण्यात आले होते.
मात्र, काही स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या या कारवाईला विरोध केला आहे. कबुतरांमुळे कोणालाही काहीही त्रास होत नाही. या भागातील बिल्डर्सची घरं विकली जात नाहीत. त्यामुळे कबुतरखाना हटवण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप स्थानिकांनी केला.
https://www.youtube.com/watch?v=1Ajh-kr4yms
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.