Mumbai News – दिवाळीचा गृहपाठ पूर्ण केला नाही, आठवीच्या विद्यार्थिनीला ट्युशन टीचरकडून बेदम मारहाण

मुंबईतील घाटकोपरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवाळीचा गृहपाठ पूर्ण केला नाही म्हणून आठवीच्या विद्यार्थिनीला ट्युशन टीचरने काठीने बेदम मारहाण केली. याप्रकरणी शिक्षिकेविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि बाल न्याय कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मी खडका असे आरोपी शिक्षिकेचे नाव आहे.
तक्रारदार वाहतूक व्यवसायी असून पत्नी आणि तीन मुलांसह घाटकोपरमध्ये राहतात. त्यांची 13 वर्षीय मुलगी स्थानिक हिंदी माध्यमाच्या शाळेत आठवीच्या वर्गात शिकते. तसेच दररोज दुपारी 2 ते 4 दरम्यान लक्ष्मी खडका चालवत असलेल्या खाजगी शिकवणी वर्गात जाते.
शुक्रवारी संध्याकाळी मुलगी ट्युशनमधून रडत घरी परतली. पालकांनी तिच्याकडे विचारणा केली असता मुलीने घडला प्रकार सांगितला. शिक्षिकेने मुलीच्या दोन्ही हातांवर काठीने जोरदार मारहाण केली. त्यामुळे हातावर लाल रंगाचे डाग आणि जखमा झाल्या.
संतप्त पालकांनी शिक्षिकेला जाब विचारला. मात्र जर विद्यार्थिनीने पुन्हा गृहपाठ पूर्ण केला नाही तर तिला दररोज त्याच पद्धतीने शिक्षा होईल, असे शिक्षिकेने सांगितले. पालकांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता शिक्षिकेने वाद घातला. यानंतर पालकांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली. पोलिसांनी बीएनएस आणि बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments are closed.