Mumbai News – वांद्र्यात निवासी इमारतीला भीषण आग; वृद्ध व्यक्तीचा मृत्यू, अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईतील वांद्रे परिसरात निवासी इमारतीला बुधवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत एका 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अग्नीशमन दलाचे दोन जवान जखमी झाले. अझीम बडोदावाला असे मयत वृद्धाचे नाव आहे. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश मिळवले. मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे पश्चिम येथील शेरली राजन रोडवरील अटलांटिक इमारतीच्या सातव्या मजल्यावर ही आग लागली.

लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी रात्री 9.12 वाजण्याच्या सुमारास अग्नीशमन दलाला अटलांटिक इमारतीत आग लागल्याचे माहिती मिळाली. आगीची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाने सुमारे दोन तासांच्या कामगिरीनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

इमारतीच्या सातव्या मजल्यावरील 701 आणि 702 क्रमांकाच्या फ्लॅटमधील विद्युत वायरिंग, विद्युत उपकरणे आणि घरातील सामानाने पेट घेतला होता. यादरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी वरच्या मजल्यावर अडकलेल्या रहिवाशांची सुखरूप सुटका केली. या आगीत एका वृद्धाचा मृत्यू झाला तर आग विझवताना अग्नीशमन दलाचे दोन जवान जखमी झाले. शिवशंकर भारत पुरी (32) आणि नवनाथ मोहन बिटे (34) यांना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Comments are closed.