परफ्युमच्या बाटल्यांवरील एक्सपायर तारखा बदलत होते, अचानक स्फोट झाले अन् कुटुंब होरपळले
परफ्युमच्या बाटल्यांवरील एक्सपायर तारखा बदलत असताना बाटल्यांमधील गॅसमुळे स्फोट झाल्याची घटना नालासोपारा परिसरात घडली. या स्फोटात एकाच कुटुंबातील चौघे जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महावीर वडर, सुनीता वडर, हर्षवर्धन वडर आणि हर्षदा वडर अशी जखमींची नावे आहेत.
नालासोपारा येथील संकेश्वरनगरमधील रोशनी अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर महावीर वडर हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. वडर कुटुंबीय गुरुवारी रात्री परफ्युमच्या बाटल्यांवरील एक्सपायर झालेल्या तारखा बदलत होते. यावेळी परफ्युमच्या बाटल्यांमध्ये स्फोट झाला.
स्फोटात वडर कुटुंब जखमी झाले. शिवाय घराच्या काचा देखील फुटल्या. स्फोटाचा आवाज ऐकून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवली.
स्फोटात वडर यांचा 9 वर्षाचा मुलगा हर्षवर्धन गंभीर जखमी झाला आहे. हर्षवर्धनला नालासोपारा येथील लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अन्य तिघांना ऑस्कर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Comments are closed.