पश्चिम रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना हिसका, सहा महिन्यांत 97 कोटींहून अधिक दंड वसूल

उपनगरीय रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेने सहा महिन्यांत तीव्र तिकीट तपासणी मोहीम राबवली आणि 97 कोटींहून अधिक दंड वसूल केला. एसी लोकलमधून वैध तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्यांनाही कारवाईचा झटका देण्यात आला. एसी लोकलमधील घुसखोर, फुकट्या प्रवाशांकडून 1.59 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

तिकीटधारक प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत पश्चिम रेल्वेने उपनगरीय लोकल ट्रेन, मेल/एक्सप्रेस गाड्या, हॉलिडे स्पेशल गाड्यांमध्ये तिकीट तपासणीची विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकांनी एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत 97.47 कोटी रुपयांचा दंड वसूल केला. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 42 टक्क्यांनी अधिक आहे. तसेच रेल्वे बोर्डाने निश्चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा जवळपास 15 टक्क्यांनी जास्त आहे. या रकमेत मुंबई उपनगरीय विभागा अंतर्गत कारवाईतील 27 कोटी रुपयांचा समावेश आहे. एकट्या सप्टेंबर महिन्यात विनातिकीट प्रवाशांकडून 13.28 कोटी रुपयांचा दंड वसूल केला. ही रक्कम गेल्या वर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत तब्बल 116 टक्क्यांनी जास्त आहे.

एसी लोकलमधून 49 हजार जणांचा बेकायदा प्रवास

आरामदायी प्रवासासाठी एसी लोकल ट्रेनमधून घुसखोरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मागील सहा महिन्यांत 49 हजार अनधिकृत प्रवाशांना एसी लोकलमधून प्रवास करताना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 1.59 कोटीचा दंड वसूल करण्यात आला. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 70 टक्क्यांनी जास्त आहे. अनधिकृत प्रवासाला आळा घालण्यासाठी हे कारवाईचे पाऊल उचलले आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.