गणेशोत्सव महिन्यावर, चाकरमानी ‘वेटिंग’वर! रेल्वेचे तिकीट न मिळाल्याने कोकणात जाण्याची चिंता, 300 जादा गाड्यांच्या बुकिंगमध्ये अनेकांची निराशा

गणेशोत्सवाला अवघा एक महिना उरला असताना हजारो चाकरमानी अद्याप रेल्वे तिकिटाच्या प्रतीक्षेत आहेत. नियमित गाडय़ांचे बुकिंग फुल्ल झाल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने जवळपास 300 जादा गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र नियमित गाड्यांप्रमाणे स्पेशल गाडय़ांच्या बुकिंगमध्ये अनेकांची निराशा झाली. त्यामुळे गणेशोत्सवाला कोकणात जायचे कसे? असा पेच चाकरमान्यांपुढे उभा राहिला आहे.

गणेशोत्सवाला मुंबई-ठाण्यातून लाखो लोक कोकणातील गावी जातात. प्रवाशांची अधिक संख्या विचारात घेत यंदा मध्य रेल्वेने 250 जादा गाडय़ांची व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वेने 44 जादा गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचे आरक्षण खुले होताच एका मिनिटात बुकिंग फुल्ल झाले. त्यामुळे तिकिटासाठी ऑनलाइन राहिलेल्या प्रवाशांच्या पदरी ‘रिग्रेट’च्या मेसेजशिवाय काहीच पडले नाही. रेल्वे प्रशासनाने वेटिंग कमी करण्यावर भर दिला होता, पण किमान 400 पर्यंत वेटिंग तिकिटे दिली आहेत. गणपती तिकीट आरक्षणात दलालांना आवर घालण्याच्या मागणीवर प्रशासन ठोस पावले उचलत नाही. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वर्षानुवर्षे परवड सुरू असल्याची नाराजी प्रवासी संघटनेचे बळीराम राणे यांनी व्यक्त केली.

रेल्वे प्रशासन अतिरिक्त व्यवस्था करणार का?

गणेश भक्तांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासन जादा गाडय़ा वा वाढीव डब्यांच्या माध्यमातून अतिरिक्त व्यवस्था करणार का? याकडे चाकरमान्यांचे लक्ष लागले आहे. कोकण रेल्वे मार्गावर बहुतांश गाडय़ा 20 ते 22 डब्यांच्या धावतात. पण या मार्गावर धावणारी ‘वंदे भारत’ ट्रेन 8 डब्यांची चालविली जाते. ‘वंदे भारत’ ट्रेन किमान 15 डब्यांची चालवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Comments are closed.