Mumbai News – पवईत गरबा खेळायला गेल्याच्या रागातून पत्नीवर चाकू हल्ला, पतीला पोलिसांकडून अटक
गरबा खेळायला गेल्याच्या रागातून पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना पवईत घडली. यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पार्कसाईट पोलीस ठाण्यात पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. महेश रजत असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आयआयटी पवईजवळील महात्मा फुले नगरमधील समता मित्र मंडळासमोरील रस्त्यावर शनिवारी रात्री ही घटना घडली. पीडिता वैशाली रजत ही रुग्णांची देखभाल करण्याचे काम करते तर तिचा पती महेश रजत हा एका कँटिनमध्ये सुपरवायझरचे काम करतो. या दाम्पत्याला दोन मुले आहेत.
वैशाली ही शनिवारी रात्री 10 वाजता परिसरात गरबा खेळायला चालली होती. महेशने तिला गरबा खेळायला जाण्यास मनाई केली. मात्र वैशालीने दुर्लक्ष करत ती गरबा खेळायला गेली. त्यानंतर 11 वाजता महेश गरब्याच्या ठिकाणी गेला आणि वैशाली घरी घेऊन येत होता. यावेळी रस्त्यात तिला शिवीगाळ करू लागला. वैशालीने त्याला घरी चर्चा करू असे सांगितल्यानंतर त्याने चाकूने तिच्या पोटावर वार केले. यात ती गंभीर जखमी झाली.
स्थानिक रहिवाशांनी तात्काळ धाव घेत वैशालीला जवळच्या महात्मा फुले रुग्णालयात नेले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी तिला राजावाडी रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पार्कसाईट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतत वैशालीचा जबाब नोंदवून घेतला. वैशालीच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी महेशविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
Comments are closed.