Mumbai News – मुंबईत पावसाची मुसळधार, विमानसेवेला फटका; इंडिगो, स्पाइसजेटकडून अॅडव्हायजरी जारी

आठवड्याची सुरवात मुसळधार पावसाने झाली असून यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे मुंबईतील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सर्वत्र वाहतूक कोंडी झाली असून लोकल आणि विमानसेवेलाही याचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे विमानाच्या उड्डाणांना विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इंडिगो आणि स्पाइसजेटकडून अॅडव्हायजरी जारी केले आहे. विमान कंपन्यांनी प्रवाशांना त्यांच्या विमानाची स्थिती तपासण्याचा आणि गैरसोय टाळण्यासाठी विमानतळावर लवकर पोहोचण्याचा सल्ला दिला.
स्पाइसजेटने X वर निवेदन जारी केले. मुंबईतील खराब हवामानामुळे विमानाचे सर्व निर्गमन/आगमन आणि परिणामी त्यांच्या उड्डाणांवर परिणाम होऊ शकतो, असे स्पाइसजेटने आपल्या निवेदनात म्हटले आहे. प्रवाशांना spicejet.com द्वारे त्यांच्या विमानाच्या स्थितीची तपासणी करण्याची विनंती एअरलाइनने केली आहे.
इंडिगोने देखील अॅडव्हायजरी जारी केली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे विमानतळाकडे जाणाऱ्या अनेक मार्गांवर वाहतूक मंदावलेली दिसून येत आहे. जर तुम्ही आज विमान प्रवास करत असाल तर कृपया आगाऊ नियोजन करा, थोडे लवकर निघा आणि बाहेर पडण्यापूर्वी आमच्या अॅप किंवा वेबसाइटवर तुमच्या फ्लाइटची स्थिती तपासा, असा सल्ला इंडिगोने आपल्या अॅडव्हायजरीत दिला आहे.
मुंबई विमानतळाकडून एक्सवर अॅडव्हायजरी जारी करत फ्लाईट चुकू नये म्हणून वेळेआधीच विमानतळावर पोहोचण्याचे प्रवाशांना आवाहन केले आहे. दरम्यान, हवामान खात्याने मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन ते चार तासांत मुंबई आणि मुंबई उपनगरातील काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Comments are closed.