मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मर्सिडीज कारची 5 जणांना धडक, जखमींमध्ये दोन परदेशी नागरिक

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मर्सिडीज चालकाने पाच जणांना धडक दिल्याची घटना घडली. जखमींमध्ये दोन परदेशी नागरिक आणि तीन विमानतळ क्रू मेंबर्सचा समावेश आहे. कार चालकाने चुकून एक्सीलेटर दाबल्याने ही घटना घडली. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

मर्सिडीज चालक नवी मुंबईतून प्रवाशांना विमानतळावर सोडण्यासाठी आला होता. विमानतळावरील गेट क्र. 1 जवळ स्पीड ब्रेकरवर चालकाने ब्रेकऐवजी एक्सीलेटर दाबला. यामुळे कार अनियंत्रित झाली आणि पाच जणांना धडक बसली. जखमी परदेशी नागरिकांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल केले आहे. तर जखमी क्रू मेंबर्सना कूपर रुग्णालयात दाखल केले आहे.

याप्रकरणी सहार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कार आणि चालक दोघांनाही ताब्यात घेतले आहे. पोलीस चालकाची चौकशी करत आहेत.

सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की घटनेदरम्यान चालक मद्यधुंद किंवा ड्रग्जच्या नशेत नव्हता. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि अधिक चौकशी सुरू आहे.

Comments are closed.