आलिशान फ्लॅट लॉटरीशिवाय खरेदी करता येणार, ताडदेवमधील म्हाडाच्या घरांची ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर विक्री

दोन वेळा सोडतीत समावेश करूनही म्हाडाची ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमधील कोट्यवधी रुपयांची आलिशान घरे विक्रीविना धूळ खात पडली आहेत. आता या घरांची ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर विक्री करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला असून त्यासाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे ताडदेवसारख्या पॉश एरियातील ही घरे अर्जदारांना आता लॉटरीशिवाय खरेदी करता येणार आहेत.
ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमधील आलिशान घरे म्हाडाच्या मुंबई मंडळाला सोडतीसाठी मिळाली आहेत. म्हाडाने पहिल्यांदा 2023च्या सोडतीत येथील सात घरांचा समावेश केला होता. 7 कोटी 52 लाख ते 7 कोटी 57 लाख या दरम्यान घरांच्या किमती ठेवल्या होत्या. विक्री न झाल्याने पुन्हा 2024 च्या सोडतीत येथील सहा घरांचा समावेश करण्यात आला. त्यावेळी या घरांच्या किमती कमी करून त्या 5 कोटी 34 लाख ते 6 कोटी 77 लाख या दरम्यान ठेवल्या. किमती कमी करूनही या घरांची विक्री झालेली नाही.
प्राधिकरणाला दरमहा दीड लाखाचा भुर्दंड
क्रिसेंट टॉवरमधील या घरांच्या मेंटेनन्सपोटी म्हाडाच्या तिजोरीतून दरमहा सुमारे दीड लाख रुपये खर्च होत आहेत. या घरांमुळे गेल्या तीन वर्षांत म्हाडाला 35 ते 40 लाख रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला आहे.
Comments are closed.