मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे महागात पडले, कोस्टल रोडच्या रेलिंगचे नुकसान प्रकरणी चालकाला 2.65 लाख रुपयांचा दंड

निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे मुंबई कोस्टल रोडच्या रेलिंगचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) एका चालकाला 2.65 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही घटना 7 ऑक्टोबर रोजी घडली होती. ब्रेच कँडी येथील रहिवासी असलेला फ्रासोगर बत्तीवाला हाजी अलीहून वरळीला जात असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरियरला धडकून रेलिंग तोडून समुद्रात पडली. चालकाला वाचवण्यात यश आले.
स्थानिक मच्छीमार आणि पोलिसांच्या मदतीने दुसऱ्या दिवशी चुंबकीय उचल उपकरणांचा वापर करून वाहन बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर, महापालिकेने बत्तीवाला याच्या ताडदेव येथील निवासस्थानी पत्र पाठवून रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक रेलिंगचे नुकसान झाल्याची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. जर त्याने दंड भरला नाही तर तो मालमत्ता करातून वसूल केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Comments are closed.