Mumbai News – सिगारेट दिली म्हणून पान टपरीवाल्याला जिवंत पेटवलं, आरोपीला पोलिसांकडून अटक

सिगारेट द्यायला नकार दिला म्हणून तरुणाने पान टपरीवाल्याला जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पान टपरीवाला गंभीर भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाला. याप्रकरणी आंबोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. जोगेश्वरी पश्चिमेकडील यादवनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागेंद्र असे अटक आरोपीचे तर राजेंद्र यादव असे पीडित पान टपरी मालकाचे नाव आहे.

राजेंद्र आणि नागेंद्र दोघेही जोगेश्वरी पश्चिमेकडील बांदिवली हिल रोडवरील फेकू पहेलवान चाळीत राहतात. राजेंद्र यांची याच परिसरात पानाची टपरी असून त्यांचा पुतण्या ही टपरी चालवतो. नागेंद्र हा त्यांच्या पुतण्याचा मित्र असून तो दररोज टपरीवर येऊन सिगारेट ओढायचा. नेहमीप्रमाणे रात्री 10.30 च्या सुमारास नागेंद्र टपरीवर सिगारेट घ्यायला आला. मात्र मागील थकबाकी बाकी असल्याने टपरीवाल्याने त्याला सिगारेट द्यायला नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. राजेंद्र यांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला आणि नागेंद्रला तेथून जाण्यास सांगितले.

नागेंद्र निघून गेला. त्यानंतर 20 मिनिटांनी पेट्रोल आणि माचिस घेऊन पुन्हा आला. नागेंद्रने पुन्हा वाद घालण्यास सुरवात केली. त्यानंतर टपरी मालक राजेंद्र यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले आणि घटनास्थळावरून पळून गेला. स्थानिकांनी तात्काळ धाव घेत राजेंद्र यांना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments are closed.