परळच्या मातीत लवकरच खेळांचे मैदान; जलतरण तलावासह भव्य आराखड्यालाही पालिकेचा सकारात्मक प्रतिसाद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गिरणगावात मराठी मातीतल्या खेळांचा दमदार आवाज घुमण्याच्या दिशेने शिवसेना नगरसेवक किरण तावडे यांनी उचललेल्या पावलांना  आता वेग मिळाला आहे. परळच्या साईबाबा पथ महापालिका शाळेच्या आवारात कबड्डी, खो-खोसाठी स्वतंत्र जागा राखीव ठेवावी म्हणून केलेल्या मागणीला मुंबई महानगरपालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे लवकरच  शाळेच्या जागेवर क्रीडा संकुलसदृश व्यवस्था उभारणार, हे जवळजवळ निश्चित झाले आहे.

निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार तावडे यांनी पालिकेच्या स्थापत्य समिती सदस्य पदाची जबाबदारी मिळताच परळच्या साईबाबा पथ म्युनिसिपल शाळेच्या उभारणीसंदर्भात पालिकेच्या अधिकाऱयांसह विशेष पाहणी दौरा केला. शाळेची इमारत दिमाखात उभी राहिल्यानंतर उर्वरित जागेत कबड्डी, खो-खो आणि बास्केटबॉलसाठी स्वतंत्र मैदाने उभारण्याचा आराखडा सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, परिसरातील मुलांना जलतरणासारख्या आधुनिक क्रीडाप्रकाराची संधी मिळावी यासाठी अद्ययावत जलतरण तलाव उभारण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला असून, महानगरपालिकेकडून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती तावडे यांनी दिली.

गेल्याच महिन्यात तावडे यांनी नगरसेवकपदी निवडून येताच खो-खो व कबड्डीवरील आपुलकीमुळे साईबाबा पथ शाळेत खेळांच्या राखीव जागेसंदर्भात महानगरपालिका शिक्षण विभागाच्या उपायुक्त डॉ. प्राची जांभेकर यांना निवेदन दिले होते. या शाळेच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे 48 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, या संकुलात खेळांसाठी स्वतंत्र मैदानाची तरतूद व्हावी, यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला आणि आता त्यांच्या पाठपुराव्याने पहिले यशस्वी पाऊल टाकले आहे. त्यामुळे लवकरच परळकरांना एक हक्काचे मैदान मिळणार, हे स्पष्ट झाले आहे.

Comments are closed.