Shaktipeeth Expressway – पैशांची नाही, आम्हाला शेतीची गरज; जमिनी गेल्यावर भिक्षा मागून खायचं का? शेतकऱ्यांचा सरकारला सवाल

शक्तीपीठ महामार्गासाठी 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची 8400 हेक्टर जमीन जाणार आहे. याच विरोधात 12 जिह्यांतील शेकडो शेतकऱ्यांनी आझाद मैदानात मोर्चा काढला आहे. याच मोर्च्यात सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याने आमच्या जमिनी गेल्यावर भिक्षा मागून खायचं का? असा सवाल महायुती सरकारला विचारला आहे.
या मोर्च्यात कोल्हापूर येथून आलेल्या एका शेतकऱ्याने आपली व्यथा मांडत सांगितलं की, “माजी 6 एकर शेती आहे, जी सगळीच्या सगळी शक्तीपीठ महामार्गात जात आहे. आमच्या कुटुंबात कोणीही नोकरीला नाही. बकरी राखून आम्ही शेती करतो. आमची शेती गेली तर आम्हाला भिक्षा मागून खावं लागेल”, असं त्यांनी सांगितलं.
‘आम्हाला शेतीची गरज आहे, पैशांची नाही’
पत्रकारांशी संवाद साधताना पत्रकारांनी त्यांना सांगितलं की, सरकार जमिनीचे पैसे देणार आहे. यावर या शेतकऱ्याने म्हटलं की, “पैसे नको आम्हाला, आमच्या जमिनी राहिल्या तर, आमच्या बायका-पोरं राबून खातील, जगतील. आम्हाला शेतीची गरज आहे पैशांची नाही.”
दरम्यान, राज्यातील 12 जिह्यांतील शेतकऱ्यांच्या कसदार, बागायती जमिनी घेऊन त्यावर शक्तिपीठ महामार्ग बांधणाऱ्या सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आझाद मैदानावर शेकडो शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढला आहे. सरकारनं आमची मागणी मान्य केली नाही तर मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढू पण जमिनी देणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी बोलून दाखवला.
Comments are closed.