महाराष्ट्राच्या राजकारणात गुलामांचा बाजार मांडलाय! राज ठाकरे यांचा हल्ला
आज हिंदुत्वाचा जो बाजार मांडून ठेवण्यात आला आहे तो पाहिला असता तर बाळासाहेब निश्चितच व्यथित झाले असते, त्यांना वेदना झाल्या असत्या. मी काय बोलून गेलो, मी काय सांगत होतो आणि आज कुठल्या परिस्थितीत तुम्ही ते सगळं आणलंत, असा प्रश्न त्यांना पडला असता.
मुंबई, दि. 23 (प्रतिनिधी) – दोनेकशे वर्षांपूर्वी चावडीवर माणसांचे लिलाव चालायचे तसेच लिलाव आज महाराष्ट्राच्या राजकारणात चालू आहेत, गुलामांचा बाजार मांडला गेलाय. कल्याण-डोंबिवलीत आणि बाकी अनेक ठिकाणी जे काही सुरू आहे ते पाहून शिसारी आली, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि देशात सत्तेसाठी फोफावलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर संताप व्यक्त केला.
बाळासाहेब आज आपल्यात नाहीत; मात्र महाराष्ट्रात आणि देशात जी राजकीय परिस्थिती आज निर्माण झाली आहे ती त्यांनी पाहिली असती तर ते व्यथित झाले असते, त्यांना यातना झाल्या असत्या, असे राज ठाकरे पुढे म्हणाले. षण्मुखानंदमधील सोहळय़ात राज ठाकरे बोलत होते.
व्यंगचित्रातला विनोद कधीच हलला नाही
बाहेर इतकं काही सुरू होतं. दंगली व्हायच्या. राडे, आंदोलनं, कधी जेल, कधी आणखी संकटं… बाहेर सगळं काही सुरू असतानाही बाळासाहेब जेव्हा व्यंगचित्र काढायला बसायचे त्या व्यंगचित्रामध्ये कधीच मारकाम दिसलं नाही. बाहेर इतका गोंधळ सुरू आहे, झटपट आटपा, व्यंगचित्र काढा आणि द्या प्रिंटिंगला असं त्यांनी कधीच केलं नाही. एकाग्रतेतून ते व्यंगचित्र काढायचे. ती नुसती व्यंगचित्रं नव्हती, तर ती त्या माणसाची समाधी होती. काहीही घडो, तरीही ना पेन्सिल हलली, ना ब्रश हलला, ना व्यंगचित्रातला विनोद हलला इतके तल्लीन होऊन त्यांनी व्यंगचित्रं रेखाटली, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या व्यंगचित्रकलेची महती सांगितली.
डॉक्टरने पक्ष बदलला की काय…
निवडणुकीआधी उद्धव ठाकरे आजारी पडले होते. सर्दी- खोकला झाला होता. नंतर आता मला सर्दी-खोकला आणि ताप सुरू झाला. माझे फॅमिली डॉक्टर यादव आहेत. मराठी यादव आहेत. त्यांच्याकडून औषधं घेऊन उद्धवना दिली. दोन दिवसांत ते बरे झाले. मी गेले सहा दिवस औषध घेतोय, अजून काहीच होत नाहीय. मी परवा उद्धवना फोन केला आणि म्हणालो, माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय, असे राज ठाकरे म्हणताच सभागृहात हशा पिकला.
मराठी माणसाबद्दल बाळासाहेबांनी एका तडफेने विचार मांडले. हिंदूंना त्यांनी हिंदू म्हणून जागृत केले. दुसऱयांचे वाभाडे काढण्यासाठी त्यांनी हे केले नाही, तर स्वाभिमान निर्माण व्हावा हा त्यांचा हेतू होता. तो स्वाभिमान, ते प्रेम आपण सतत सगळेजण जागृत ठेवू.
बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आज सुरू होत आहे. मलाही काही कल्पना सुचतील, उद्धवनाही काही सुचतील, तुम्हालाही सुचतील. येणाऱ्या पिढ्यांसाठी एक आदर्श असं हे वर्ष आपण लोकांपुढे ठेवू. बाळासाहेब काय होते हे मांडण्याचा प्रयत्न करू.
हिंदू ही राजकीय शक्ती बनवली
प्रमोद महाजनांनी सांगितलेला एक किस्सा यावेळी राज ठाकरे यांनी सांगितला. 84-85ची गोष्ट असेल. बाळासाहेब कलानगरात फेऱया मारायचे. एके दिवशी महाजन त्यांच्यासोबत होते. तेव्हा त्यांना ते म्हणाले, देशातल्या हिंदूंना मी हिंदू म्हणून मतदान करायला लावीन आणि हिंदू मतदार तयार होतील. त्यावर हे शक्य नाही असे महाजन म्हणाले असता, तू मला ओळखत नाहीस, असे बाळासाहेबांनी सांगितले आणि नंतर बाळासाहेबांनी ते जे बोलले ते करून दाखवले. या देशात हिंदू एक राजकीय शक्ती बनू शकते हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. तोपर्यंत असं काही होऊ शकतं याची या देशात कुणाला कल्पनाही नव्हती. अगदी भाजपलाही, अशी आठवण राज यांनी सांगितली. आज हिंदुत्वाचा जो बाजार मांडून ठेवण्यात आला आहे तो पाहिला असता तर बाळासाहेब निश्चितच व्यथित झाले असते, त्यांना वेदना झाल्या असत्या. मी काय बोलून गेलो, मी काय सांगत होतो आणि आज कुठल्या परिस्थितीत तुम्ही ते सगळं आणलंत, असा प्रश्न त्यांना पडला असता, असे नमूद करत राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या राजकारणावर तोफ डागली.
ते आता त्याच्यासोबत निघून जात आहेत.
मी जेव्हा बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळय़ा होत्या. माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं. माझ्यासाठी घर सोडणं होतं. त्या सगळय़ा गोष्टींना आता वीस वर्षांचा काळ निघून गेला आहे. अनेक गोष्टी मला उमजल्या, अनेक गोष्टी उद्धवनाही उमजल्या असतील. द्या सोडून ते आता, असे राज ठाकरे उद्गारताच सभागृहात टाळय़ांचा कडकडाट झाला.
बाळासाहेबांवर व्याख्यान
बाळासाहेब ठाकरे या विषयावर मला व्याख्यान द्यायला आवडेल. त्या माणसाचे सगळे पैलू मला तुमच्यासमोर मांडायचे आहेत. ते कसे होते हे जगाला कळले नाही आणि आम्हालाही कळू शकले नाही, पण जे काही त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं ते विलक्षण होतं, अद्भुत होतं, असे राज ठाकरे म्हणाले.
मुंबईवरचा शिवरायांचा भगवा उतरवून काय मिळवलंत? महापौरपद… अरे, आपल्याकडे 25 वर्षे सत्ता होती आणि आजसुद्धा आपल्याला मते कमी मिळालेली नाहीत. मुंबईतील सर्व गड आपण राखलेले आहेत. हे कर्तृत्व माझ्या शिवसैनिकांचं आहे. माझं एकट्याचं नाही.
मुंबईची लढाई तुम्ही चांगली लढलात. निकालावर सगळे हळहळताहेत. देशभरातून तशा प्रतिक्रिया येताहेत. जो एक आभास, जे एक चित्र निर्माण केलं गेलं की, आता शिवसेना संपली, ठाकरे नाव पुसून टाकणार… त्याला तुम्ही सगळय़ांनी मिळून रोखलंत. हे फक्त महाराष्ट्रच करू शकतो.
राज असेल, मी असेन, आम्ही वादळामध्ये खेळत मोठे झालेले आहोत. त्यामुळे वादळाशी कसं लढायचं हे आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. वादळाशी जसं लढायचं असतं तशी वादळाची जबाबदारी खांद्यावरती पेलणं किती कठीण असतं हे ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी येते त्यालाच कळू शकतं.
Comments are closed.