वरळी कोस्टल रोडवर भरधाव कार समुद्रात कोसळली, एमएसएफ कर्मचाऱ्यांनी वाचवले चालकाचे प्राण

भरधाव कार रेलिंग तोडून समुद्रात कोसळल्याची घटना वरळी कोस्टल रोडवर सोमवारी रात्री उशिरा घडली. यावेळी परिसरात गस्त घालणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत चालकाला बुडत्या कारमधून बाहेर काढले. फ्राशोगोर दर्युष बत्तीवाला (28) असे असे बचावलेल्या चालकाचे नाव आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास कार महालक्ष्मीहून वरळीकडे जात असताना अतिवेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. यानंतर कार दुभाजकाला धडकत रेलिंग तोडून थेट समुद्रात कोसळली. सुदैवाने, एमएसएफ टीमने तात्काळ कारवाई करत चालकाचे प्राण वाचवले. चालकाला किरकोळ दुखापत झाली असून उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी चालकाचा जबाब नोंदवला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. घटनेदरम्यान बत्तीवाला दारूच्या नशेत होता का याचाही तपास करीत असल्याचे वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पाटील यांनी सांगितले.

Comments are closed.