Mumbai News – कोस्टल रोडवर भरधाव कारला अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दक्षिण मुंबईतील कोस्टल रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या पोर्शे कारला रविवारी सकाळी अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार दुभाजकाला (डिवायडर) जाऊन धडकली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वेळेवर एअरबॅग्ज उघडल्यामुळे चालकाचे प्राण वाचले. अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले. तसेच अपघाताचा कोस्टल रोडवरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. कोस्टल रोडच्या बोगद्यात कारला आग लागल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. ती घटना ताजी असतानाच हा अपघात घडला.

कोस्टल रोडवर भरधाव वेगाने गाड्या चालवण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून छोट्या-मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे. रविवारी सकाळी देखील भरधाव वेगामुळे कारला अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

काही दिवसांपूर्वीच याच कोस्टल रोडच्या बोगद्यात कारला भीषण आग लागली होती आणि धुराचे साम्राज्य पसरून वाहनचालकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. त्या घटनेनंतर काही दिवसांतच रविवारी सकाळी भरधाव कारला अपघात झाला. सुट्टीचा दिवस असल्याने कोस्टल रोडवर वाहनांचे प्रमाण तुलनेत अधिक होते. याचदरम्यान कार दुभाजकाला धडकून अपघात झाल्याने त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. काही काळ वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Comments are closed.