भायखळ्याच्या राणी बागेत शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील व्यवस्थापनाकडून हेळसांड

महापालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात ‘शक्ती’ वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तो दहा वर्षांचा होता. या वाघाला अपस्माराचे झटके आल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज उद्यान प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला असला तरी मृत्यूची माहिती आठ दिवस जाहीर केली नसल्यामुळे उद्यान व्यवस्थापनाकडून देखभालीत हेळसांड झाल्याने वाघाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

पालिकेच्या प्राणिसंग्रहालयात 2020 मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या प्राणिसंग्रहालयातून ‘शक्ती’ वाघ आणण्यात आला होता. त्यावेळी तो साडेतीन वर्षांचा होता. आता त्याची पूर्ण वाढ झाली होती. उद्यान प्रशासनाने केलेल्या नैसर्गिक अधिवासात तो राहत होता. या ठिकाणी त्याला मांसाहार देण्यात येत होता. शिवाय मुबलक पाणी, बसण्यासाठी-विहार करण्यासाठी छोटे पाणवठे तयार करण्यात आले होते. त्याच्यासोबत दुसरा वाघ ‘जय’ आणि वाघीण ‘करिश्मा’देखील वास्तव्यास आहेत. मात्र 17 नोव्हेंबर रोजी अचानक ‘शक्ती’ वाघाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर फिट्स आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे उद्यान प्रशासनाकडून सांगण्यात आले.

श्वसननलिकेत अडकले हाड

हा वाघ मांस खाताना एक हाड श्वसननलिकेत अडकले होते आणि याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे वाघाचा मृत्यू झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते प्रथमेश जगताप यांनी केला आहे. कायद्यानुसार महाराष्ट्र झू अॅथोरिटी, सेंट्रल झू अॅथोरिटीला वाघाच्या मृत्यूबाबत सविस्तर माहिती देणे आवश्यक असताना केवळ ई-मेलने कळवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. वाघाचा मृत्यू जाहीर करण्याआधी उद्यान प्रशासनाने मृत वाघाची विल्हेवाट कशी लावली, वाघाच्या पोस्टमॉर्टमचे रेकार्ंडग करून 24 तास देखरेखीखाली ठेवले का, असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत.

मृत्यू जाहीर करायला आठ दिवस का लागले?

प्रथमेश जगताप यांनी माहिती अधिकारात ‘शक्ती’ वाघाबाबत माहिती मिळवल्यामुळे वाघाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. वाघाचा मृत्यू 17 नोव्हेंबर रोजी झाला असताना आठ दिवसांनी 24 नोव्हेंबर रोजी माहिती देण्यात आली. त्यावरून मृत्यू जाहीर करायला आठ दिवस का लागले, असा सवाल आमदार अजय चौधरी यांनी केला. वाघाच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी चौधरी यांनी केली.

प्रणिसंग्रहालयात ‘शक्ती’ वाघ पूर्णपणे तंदुरुस्त होता. यापूर्वीदेखील त्याच्यात कोणत्याही आजाराची लक्षणे दिसली नव्हती. मात्र अचानक फिट्स येऊ लागल्या आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अवयवाचे नमुने नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र येथे पाठवले असून पॅथोलॉजी डिपार्टमेंटच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. – डॉ. संजय त्रिपाठी, संचालक

Comments are closed.