Mumbai News – कोस्टल रोडवर अपघात, भरधाव टेम्पोचा पाठलाग करताना समुद्रात पडून ट्रॅफिक वॉर्डनचा मृत्यू

मुंबई कोस्टल रोडवर भयानक अपघाताची घटना शनिवारी सायंकाळी घडली. भरधाव भरधाव टेम्पोचा पाठलाग करताना समुद्रात पडून ट्रॅफिक वार्डनचा मृत्यू झाला. रफिक वजीर शेख असे मयत ट्रॅफिक वार्डनचे नाव आहे. याप्रकरणी गावदेवी पोलिसात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रफिक शेख हे शनिवारी मुंबई कोस्टल रोडवर कर्तव्यावर होते. सायंकाळी 5.21 वाजता धर्मवीर संभाजी राजे कोस्टल रोडवर टाटा गार्डनहून वरळीकडे एक टेम्पो वेगात चालला होता. टेम्पो थांबवण्यासाठी ट्रॅफिक वॉर्डन रफिक शेख यांनी आपल्या स्कूटरवरून त्याचा पाठलाग सुरू केला.

टेम्पोचा पाठलाग करताना कोस्टल रोडवरील एका वळणावर शेख यांचे स्कूटरवरील नियंत्रण सुटले. यामुळे दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट बॅरिकेडला धडकली. धडकेनंतर शेख हे पुलावरून समुद्रात फेकले गेले.

घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत शेख यांना पाण्यातून बाहेर काढले. शेख यांना तात्काळ नायर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Comments are closed.