Mumbai News – पंतप्रधानांचे बनावट पत्र वापरून खंडणी उकळण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बनावट स्वाक्षरी असलेले पत्र वापरून एका व्यक्तीकडून 4 लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने दोन व्यक्तींना अटक केली आहे. आरोपींना एस्प्लेनेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तौसीफ हुसेन इस्माईल पटेल आणि सिद्धीनाथ दीनानाथ पांडे ऊर्फ सुनील अशी आरोपींची नावे आहेत.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही आरोपी गोरेगाव येथील शास्त्रीनगरमधील रहिवासी असून एकाच जाहिरात क्षेत्रातील कंपनीशी संबंधित आहेत. तर तक्रारदार एक स्वयंसेवी संस्था चालवतो. ही संस्था 2020 पासून समाजकार्यात सक्रिय असून, वंचित मुले, वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमासाठी काम करते. तक्रारदार आणि आरोपी 2022 मध्ये एका कार्यक्रमादरम्यान संपर्कात आले. दोन्ही आरोपींनी स्वतःची ओळख पत्रकार म्हणून दिली होती. यानंतर व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ते नियमित तक्रारदाराच्या संपर्कात होते.

पटेल याने 18 मार्च रोजी तक्रारदाराला व्हॉट्सअ‍ॅपवर एक व्हॉइस नोट पाठवून पैशांच्या बदल्यात पंतप्रधान कार्यालयातून वाढदिवसाच्या शुभेच्छांचे पत्र मिळवून देतो सांगत त्यासाठी 4 लाख रुपये पीआर चार्जेस लागतील असे सांगितले. तक्रारदाराने सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले; मात्र आरोपींनी हा प्रस्ताव पूर्णपणे खरा असल्याचे सांगत आग्रह सुरूच ठेवला.

फरनाज वाडिया हिने 28 मार्च रोजी पंतप्रधान मोदी यांची स्वाक्षरी असलेले एक पत्र तक्रारदाराला डिजिटल स्वरूपात पाठवले. या पत्रात तक्रारदाराच्या समाजकार्याची प्रशंसा करण्यात आली होती. तक्रारदाराने हे पत्र काही काळासाठी सोशल मीडियावर शेअर केले होते; मात्र तिच्या सहकाऱ्यांनी पत्राच्या सत्यतेबाबत शंका उपस्थित केल्यानंतर, तिने ते पत्र सोशल मीडियावरून काढून टाकले.

आरोपींनी पैशांसाठी दबाव वाढवल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने वरळी सी फेस येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचत 4 लाख रुपये स्वीकारताना आरोपींना रंगेहाथ पकडले. आरोपींकडून पंतप्रधानांचे बनावट पत्र, बनावट चलनी नोटांचे पुडके आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अरुण थोरात पुढील तपास करत आहेत.

Comments are closed.