निष्काळजीपणाचा बळी… बांधकामाच्या इमारतीची वीट डोक्यात पडून तरुणीचा मृत्यू, जोगेश्वरीतील घटनेने हळहळ

जोगेश्वरी पूर्व येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची सिमेंटची वीट डोक्यात पडून एका 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संस्कृती अमिन असे या मुलीचे नाव आहे. ही तरुणी कामावर जात असतानाच सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात घडला.

जोगेश्वरीच्या मजासवाडी येथे या बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे, मात्र आज एक सिमेंट ब्लॉक या तरुणीच्या डोक्यात कोसळला आणि तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली. हा प्रकार लक्षात येताच स्थानिकांनी धावाधाव करून गंभीर जखमी तरुणीला रुग्णालयात पालिकेच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले, मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्याआधीच तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, यामध्ये नेमकी चूक कुणाची हे अजून समोर आलेले नाही. या दुर्घटनेबाबत मेघवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस पुढील तपास करीत असून याप्रकरणी चार कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळते.

चार दिवसांपूर्वीच मिळाली नोकरी

मृत मुलीचे वडील अनिल अमिन (56) हे पत्नी सुप्रिया, आई पद्मावती, मुलगी संस्कृती आणि भाची निशीता यांच्यासोबत राहतात. त्यांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. संस्कृतीला गेल्या चार दिवसांपूर्वीच गोरेगाव पश्चिम येथील ‘आरबीएल’ येथे कामाला जात होती. या दुर्घटनेविरोधात संस्कृतीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Comments are closed.