नालेसफाईचा गाळात झोलझाल सुरूच, गाळात 40 टक्के फेरफार झाल्याचे उघड

डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येणाऱ्या नालेसफाईच्या गाळाचे ‘एआय’ने केलेल्या विश्लेषणात तब्बल 40 टक्के फेरफार झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे याबाबत तातडीने पालिका आयुक्तांनी डेटा अ‍ॅनालिसीस करावे आणि कंत्राटदारांकडून 100 टक्के नालेसफाईवर भर द्यावा. प्रसंगी पालिका आयुक्तांनी रस्त्यावर उतरून पाहणी करावी, असे निर्देश मुंबई जिल्हा उपनगरचे पालकमंत्री आशीष शेलार यांनी दिले आहेत.

मुंबई जिल्हा उपनगराचे पालकमंत्री अ‍ॅड. आशीष शेलार यांनी गुरुवारी मुंबई उपनगरातील नालेसफाईच्या कामाची पाहणी केल्यानंतर पालिकेच्या नालेसफाईवर जोरदार टीका करत त्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना जबाबदार धरले. आज त्यांनी पूर्व उपनगरातील नाल्यांची पाहणी केली. त्यांनी घाटकोपर बस डेपो शेजारी असणाऱ्या लक्ष्मीनगर, एपीआय नाला, उषानगर नाला, माहुल नाला, माहुल खाडी परिसर आणि खारू खाडी येथील कामाची पाहणी केली.

17 हजार फेऱ्यांमध्ये फेरफार

मुंबईतील नालेसफाईवर पालिकेच्या ‘एआय’च्या माध्यमातून लक्ष ठेवले जाते. गाळ मोजणी आणि इतर कामांसाठी मॅपिंगही केले जाते. प्रत्येक ट्रीपमधून नालेसफाईचा जो गाळ जातो तो गाळ ज्या ठिकाणी पडतो याचे जे व्हिडीओ येतात त्याला ‘एआय’च्या माध्यमातून स्पॅन केले जाते. त्यात 40 हजाराच्या वर फेऱ्या झाल्या असून त्यातील 17 हजार गाडय़ांच्या फेऱ्यांमध्ये फेरफार करण्यात आल्याचे आढळले.

…तर भांडुप-कांजूर रेल्वे ट्रॅक पुन्हा पाण्याखाली

भांडुप येथील एपीआय नाला व उषानगर नाल्याची पाहणी करण्यात आली. उषानगर नाला हा रेल्वेच्या पुलाखालून जातो. 2020 पासून पुलाचे बांधकाम आणि नाल्याचे खोलीकरण करणे अपेक्षित होते, परंतु आता हा पूल तोडायला घेतला आहे. पूल तोडण्यासाठी केवळ 15 दिवस बाकी असताना हा पूल तोडणार कधी आणि नाला बांधणार कधी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या नाल्याचे काम योग्य पद्धतीने झाले नाही तर कांजूरमार्ग व भांडुपच्या दरम्यान रेल्वे ट्रॅकवर नेहमीप्रमाणे पाणी साठणार आहे.

Comments are closed.