जुहू, गिरगाव चौपाटीवर माऊंटेड पोलीस पथकाची गस्त, ऐटदार अश्व ठरताहेत पर्यटकांचे आकर्षण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

>> आशिष बनसोडे

मुंबईतील जुहू आणि गिरगाव चौपाटीला नवे सुरक्षा कवच लाभले आहे. मुंबई पोलीस दलातील माऊंटेड पथकाची नजर आता समुद्रकिनाऱयांवर राहणार आहे. आतापर्यंत केवळ स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला तसेच पोलीस क्रीडा स्पर्धांसाठी वापरल्या जाणाऱया पोलीस दलातील ऐटदार अश्वांचा मुंबईतील समुद्रकिनाऱयांच्या सुरक्षेसाठी वापर होणार आहे. रोज सकाळी व संध्याकाळी दोन्ही चौपाटय़ांवर अश्व पथकांची गस्त सुरू झाली आहे. हे पथक पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

सुबोधकुमार जायसवाल हे पोलीस आयुक्त असताना 2021 मध्ये तब्बल 88 वर्षांनंतर मुंबई पोलीस दलात माऊंडेड पोलीस पथकाची स्थापना करण्यात आली होती. तेव्हा या पथकाचे जोरदार स्वागत झाले. परंतु सोयीसुविधा व इतर कारणांमुळे हे अश्व पथक तितकेसे प्रभावी ठरले नाही. यातील काही अश्वांचा अकाली मृत्यू झाला तर काही अश्वांना पोलीस अकादमीला पाठविण्यात आले. हे पथक गाशा गुंडाळणार अशी बोलले जात होते. मात्र वरिष्ठ अधिकाऱयांनी दखल घेत मरोळ येथे अश्वांसाठी प्रशस्त अलिशान तबेला, जलतरण व बिकानेर वाळूचे मैदान तयार केले. त्याचबरोबर माऊंटेड पथकात नव्या दमाचे ऐटदार 18 अश्व घेण्यात आले. त्यामुळे या दलातील अश्वांची संख्या 22 इतकी झाली. गेल्या वर्षभरात या अश्वांना केवळ 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि क्रीडा स्पर्धांसाठी वापरले जात होते. पण मुंबईच्या समुद्रकिनाऱयांवर पथकाची गस्त होताना दिसत नव्हती. वरिष्ठ अधिकाऱयांनी आता पथकाला समुद्रकिनाऱयांवर गस्त घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. थेरो जातीचे ऐटदार अश्व व त्यावर स्वार पोलीस अंमलदार गस्त घालू लागले आहेत. त्यामुळे पर्यटाकांमध्ये पुतूहूल निर्माण झाले आहे.

 गिरगाव चौपाटीवर सकाळी मेघदूत व त्याचे रायडर हनुमान कांबळे आणि सुवर्णरेखा व रायडर खुणे तर संध्याकाळी विजयज्योती व रायडर विकास राठोड आणि अर्जुन व रायडर बाभणे हे गस्त घालतात. तर जुहू चौपाटीवर सकाळी चेतक रायडर हनुमान जाधव, तुफान व रायडर दाभाडे तर संध्याकाळी बाजी व रायडर आकाश हावळे, करिष्मा व रायडर चाटे हे गस्त घालत आहेत.  माऊंटेड पोलीस पथकातील अश्व फारसे माणसाळलेले नसल्याने गर्दीच्या वेळेस गस्त घालताना विशेष काळजी घ्यावी लागत आहे. थोडे दिवस अडचण होईल. त्यानंतर सर्वकाही सुरळीत होईल असे पोलिसांनी सांगितले.  गर्दीच्या वेळेस पोलिस घोडय़ावरून गस्त घालू लागल्याने नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना आहे तर, समाजपंटकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

Comments are closed.