आमदार चषक कबड्डी स्पर्धा – मुंबई बंदर, ठाणे महापालिका उपांत्य फेरीत; शिवशक्तीसह राजमाता जिजाऊ, धर्मवीरचा झंझावात कायम
क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणार्या चढाया-पकडींच्या संघर्षात मुंबईच्या मुंबई बंदर, भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) आणि आयएसपीएलसह (इन्शुअरकोट स्पोर्ट्स प्रा. लि.)ठाणे महानगर पालिका या संघांनी थरारक विजयासह आमदार सुनील राऊत यांच्या पुढाकाराने सुरु असलेल्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या व्यावसायिक गटाची उपांत्य फेरी गाठली. महिला गटातही अंगावर शहारे आणणार्या रोमहर्षक लढतीनंतर मुंबईच्या शिवशक्ती, पुण्याच्या राजमाता जिजाऊ, पतंगराव कदम संघ आणि नंदुरबारच्या धर्मवीर कबड्डी संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. आता पुरुषांच्या व्यावसायिक गटात आयएसपीएलची गाठ ठाणे महानगरपालिकेशी पडेल तर बीपीसीएल मुंबई बंदरशी भिडेल. महिलांच्या गटात राजमाता जिजाऊ – पतंगराव कदम, शिवशक्ती- धर्मवीर अशा अटीतटीच्या लढती रंगतील.
विक्रोळी पूर्वेला टागोर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुरु असलेल्या कबड्डीच्या झटापटीत तिसर्या दिवशी कबड्डीप्रेमींना थरारक सामन्यांची मेजवानी चाखता आला आली. उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी झालेल्या चारही उपांत्य पूर्व लढतीचा पैâसला शेवटच्या मिनीटालाच झाला. मुंबई बंदरने साइल पाटील, राहुल टाके यांच्या खोलवर चढायांनी मध्यंतराला संत सोपान काका बँकेविरुद्ध 20-13 अशी आघाडी मिळवून दिली, पण मध्यंतरानंतर संत सोपान काकाच्या दीपक सांगळे आणि धीरज देवरेने वेगवान खेळ करत सामन्यात जान ओतली. शेवटची पाच मिनीटे असताना बरोबरीत असलेला खेळ शेवटी मुंबई बंदरने 36-32 असा जिंकत उपांत्य फेरीत स्थान मिळवले. ठाणे आणि मिरा-भायंदर या महानगर पालिका यांच्यात पहिल्या मिनीटापासून संघर्षाची ठिणगी पडली. त्यामुळे पहिल्या सत्रात 14-14 असा बरोबरीचा खेळ रंगला. मध्यंतरानंतर दोन्ही संघाच्या चढाईबहाद्दरांनी आघाडी घेण्यासाठी जोरदार खेळ केला, पण स्कोर समान रेषेतच धावत होता. अखेर शेवटच्या क्षणी ठाण्याने मीरा भायंदरला 28-25 असे मागे टाकत उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा दूर केला.
पिछाडीनंतर बीपीसीएलची कमाल
सौरभ फगारे आणि साईप्रसाद पाटील यांच्या भन्नाट चढायांनी सीजीएसटीला (सेंट्रल गुड्स अॅण्ड सर्व्हिस टॅक्स) बीपीसीएलविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत मध्यंतराला 20-10 अशी अफलातून आघाडी मिळवून दिली होती. बीपीसीएलचे मिलन दहिया, तुषार अदावडे प्रभावी ठरत नव्हते. मात्र मध्यंतरानंतर बीपीसीएल संघात अशी जादू संचारली की त्यांनी पहिल्या दहा मिनीटात आधी पिछाडी भरून सामन्यात पुनरागमन केले. मग सीजीएसटीविरुद्ध एकेका गुणाची कमाई करत आघाडी घेतली. शेवटची पाच मिनिटे शिल्लक असताना बीपीसीएलने 33-27 अशी आघाडी कमावली होती. मग बुद्धिचार्तुयाचा वापर करत आपली आघाडी टिकवली आणि सीजीएसटीविरुद्धचा संघर्ष 35-30 असा जिंकली. आयएसपीएलने मुंबई पोस्टलचे आव्हान 46-34 असे सहज मोडीत काढत अंतिम चार संघात स्थान मिळवले.
महिलांमध्ये थरारच थरार
महिलांच्या उपांत्यपूर्व फेरींच्या सामन्यात कमालीचा संघर्ष पाहायला मिळाला. पतंगराव कदम आणि स्वराज्य स्पोर्ट्स क्लब यांच्यात झालेल्या सामन्यात तुल्यबळ लढत झाली. सानिका खाडे आणि आर्या लवार्डे हिने पतंगराव कदमला आघाडी मिळवून देण्यासाठी आक्रमक खेळ केला. दुसरीकडे याशिका पुजारी आणि प्रतीक्षा तांडेलच्या चढायांनी स्वराज्यसाठी गुणांचा सपाटा लावला. पण मध्यंतराला 16-16 असा खेळ बरोबरीत थांबला. मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी आघाडीसाठी जंग जंग पछाडले. पण गुणफलक समान रेषेतच धावत होता. अखेर पतंगराव कदम संघाने 33-31 अशी दोन गुणांनी बाजी मारली. धर्मवीर आणि श्रीराम कबड्डी संघ यांच्यातला थरारही 35-33 असा संपला. धर्मवीरच्या समृद्धी कोळेकर आणि हर्षदा हुंडारे या 2 गुणांच्या निसटत्या विजयात मानकरी ठरल्या. राजमाता जिजाऊ आणि विवेक स्पोर्ट्स यांच्यातही काँटे की टक्कर झाली. राजमाता जिजाऊ 24-14 अशी आघाडीवर होती. पण उत्तरार्धात विवेकच्या स्वीटी आणि संजना पोळने प्रतिस्पर्ध्यांच्या पोटात गोळा आणणारा खेळ केला. बरोबरीत चाललेला हा थरार विवेकने अवघ्या 38-40 अशा फरकाने गमावला. राजमाता जिजाऊच्या निकीता पडवळ, रेखा सावंत विजयाच्या शिल्पकार ठरल्या.
उद्धव ठाकरेंनी कबड्डीपटूंना दिल्या शुभेच्छा
कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने विक्रोळीतला कबड्डी जल्लोष पाहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भारावले. उपनगरातील मराठी माणसांनी स्पर्धेच्या निमित्ताने आपला ठसा कायम ठेवल्याचे सांगत सर्वांचे कौतुक केले. तसेच क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांनी या स्पर्धेची परंपरा यापुढेही कायम ठेवावी, अशा शुभेच्छा देत स्पर्धेत खेळत असलेल्या खेळाडूंनाही भरभरून दाद दिली. याप्रसंगी शिवसेना खासदार संजय राऊत, आमदार सचिन अहिर, विभागप्रमुख रमेश कोरगावकर, नगरसेविका राजोल पाटीलही उपस्थित होत्या.
Comments are closed.