Mumbai pune and other districts affected by Rain on Saturday


पुणे : पुण्यासह राज्यभरात पावसाने शनिवारी (7 जून) पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. याआधी 26 मे रोजी अनपेक्षित पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईत काही सखल भागात पाणी साचले होते. त्यानंतर दखल घेण्यासारखा पाऊस पडला नाही. मात्र, एवढ्या दिवसानंतर शनिवारी पुन्हा एकदा ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट करत दुपारी पाऊस बरसला. त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले. विशेष म्हणजे डोंबिवली आणि पिंपरी-चिंचवड ही दोन्ही शहरे जलमय झाली. (Mumbai pune and other districts affected by Rain on Saturday)

हेही वाचा : Maharashtra Election 2024 : आगामी निवडणुकीतही मतदान चोरीचा पॅटर्न राबवण्याचे षडयंत्र, हर्षवर्धन सपकाळांचा दावा 

मुंबईत सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीत शहर भागात 2.74 मिमी, पूर्व उपनगरात 8.98 मिमी तर पश्चिम उपनगरात 18.67 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. हवामान खात्याने पावसाचा अंदाज घेत लागलीच रेड अलर्टचा इशारा दिला होता. मात्र, 26 मे रोजीसारखा जोरदार पाऊस पडला नाही. दरम्यान, हवामान खात्याने आगामी 24 तासांत शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज वर्तविला आहे. आकाशात ढगांचा गडगडाट होईल, काही भागात पावसाच्या तुरळक, हलक्या सरी तर काही ठिकाणी पावसाच्या मध्यम सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.

शनिवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीत शहर भागातील महालक्ष्मी येथे – 69 मिमी, मुंबई सेंट्रल – 59 मिमी, भायखळा येथे 53 मिमी, पूर्व उपनगरातील मानखुर्द भागात 57 मिमी, भांडुप येथे 46 मिमी तर पश्चिम उपनगरातील बोरिवली येथे 40 मिमी आणि दिंडोशी येथे 29 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. ही आकडेवारी पाहता सर्वाधिक पावसाच्या सरी शहर भागात कोसळल्या आहेत. सुदैवाने या पावसाचा जोर जास्त वेळ राहिला नाही. त्यामुळे सखल भागात पावसाचे पाणी तुंबले नाही.

शॉर्ट सर्किट आणि झाडे/फांद्या यांच्या पडझडीच्या घटना

शनिवारी दुपारी काही काळ चांगला पाऊस पडला. याच पावसादरम्यान शहर भागात 4 ठिकाणी, पूर्व उपनगरात – 2 ठिकाणी तर पश्चिम उपनगरात – 1 ठिकाणी अशा 7 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. तर शहर भागात 1 ठिकाणी आणि पश्चिम उपनगरात 4 ठिकाणी अशा एकूण 5 ठिकाणी झाडे, फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. मात्र या सर्व घटनांत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.



Source link

Comments are closed.