“वाहतूक कोंडीला प्रशासन जबाबदार, मुख्यमंत्र्यांचं लक्ष नसल्यामुळे…,” संजय राऊत यांचा घणाघात
महाराष्ट्र दिनामुळे सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे बाहेर पडलेले मुंबई, ठाणेकर एक्प्रेस वेवर वाहतूक कोंडीत अडकले. एकाच वेळी एक्सप्रेस वेवर आलेल्या हजारो गाड्या आणि सरकारने मिसिंग लिंकच्या उद्घाटनाचा घातलेला घाट याचा मोठा फटका वाहतुकीला बसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नागरिकांची माफी मागितली. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत प्रशासनावर हल्लाबोल केला. हा मुख्यमंत्र्याचा दोष नसून या परिस्थितीला मुख्यमंत्र्यांचं प्रशासन जबाबदार असल्याचे त्यांनी नमूद केले.
संजय राऊत यांनी शविवारी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या वाहतूक कोंडीवर भाष्य केलं. ते म्हणाले की, कालच्या वाहतूक कोंडीत हजारो लोक रस्त्यावर अडकले होते. यामध्ये मुख्यमंत्र्यांचा दोष नसून हा नियोजनाचा अभाव आहे. आपल्याकडे अजूनही व्हिआयपींच्या सोयींसाठी सगळी आखणी करण्याची प्रशासनाची मानसिकता आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या घटना घडतात. मिसिंग लिंक जवळ बैल कापा किंवा रस्ता अडवा असं एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं नाही ना? या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या सुचना नसतात. हे प्रशासन परस्पर करत असते. अशा प्रकरारचे उद्घाटन सोहळे लोकांना त्रास न होऊ देता सोप्या पद्धतीने करणं गरजेचे असतं. उद्घाटनाचे मुहूर्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी काढलेले नाहीत. त्यामुळे या परिस्थितीला मुख्यमंत्र्य़ांच प्रशासन जबाबदार आहे, असे राऊत यावेळी म्हणाले.
वाहतुक कोंडीत खासदार सुप्रिया सुळेही अडकल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांची आणि नागरिकांची माफी मागितली. यावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले. मुख्यमंत्र्यांनी जरी माफी मागितली तरी या घटना वारंवार होत आहेत. मुख्यमंत्र्यांच लक्ष नसल्यामुळे या घटना घडतात, असे ते म्हणाले. एवढा शो करायची काय़ गरज होती?तुम्ही करून दाखवलं आणि लोकांनाही ते कळलंय. आणि जगात सगळ्या गोष्टी फक्त तुम्हीच करू शकता. आम्हाला नाही जमलं काय. हा महाराष्ट्र जो घडवलाय तुमच्या जन्माच्य़ा आधीपासून. जायकवाडी, मुंबईतील त्या काळचे 56 पूल, बाळासाहेब ठाकरे यांनी आणलेली झोपडपट्टी पुनर्वसन योजना किंवा अन्य रस्ते, मुंबई एक्सप्रेस हायवे, फ्री वे ही सगळी विकासकामं तुम्हीच केलीयेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील कामगिरीचा उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये महाराष्ट्राचं आरोग्य आणि महाराष्ट्रातील जनतेचा जीव वाचवणं हे त्यांच्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं. कोविड काळात एकनाथ शिंदेचा सुद्धा जीव वाचला, असे म्हणत त्यांनी टोला लगावला. त्या काळात माणसांचे प्राण वाचवणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. असं आव्हान कोणत्याही मुख्यमंत्र्यासमोर नव्हतं. झाडं तोडणं, रस्ते बांधणं हे केव्हाही होऊ शकतं पण लाखो मराठी जनतेचे प्राण वाचवणं हे सगळ्यात मोठं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.
उत्तर प्रदेशातील गंगेत वाहून आलेल्या मृतदेहांचा संदर्भ देत सांगितले की, एकदा एकनाथ शिंदेनी अयोध्येला जाताना गंगा नदीची पाहणी करावी आणि आसपासच्या लोकांशी बोलावं. कोविड काळात तिथे हजारो प्रेत पाण्यात फेकण्यात आली होती. महाराष्ट्रावरती ही वेळ उद्धव ठाकरे साहेबांनी येऊ दिली नाही. याबद्दल उपमुख्यमंत्र्यानी राजकीय मतभेद असले तरी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. मिसिंग लिंक, हा लिंक तो लिंक सगळं ठीक आहे, पण हे किती मोठं काम त्यांनी केलं आणि ते काम घरूनच बसून करायचं होतं. त्या काळामध्ये लोकांना घराबाहेर पडून न देणं हे मोठं आव्हान होतं आणि महाराष्ट्राने ते आव्हान पेललं. जर मुख्यमंत्री बाहेर पडले असते तर जनता बाहेर पडली असती आणि माणसांचे बळी गेले असते. या गोष्टी त्यांना कळतं नाही म्हणून ते असं बोलतात, असे ते म्हणाले.
Comments are closed.