मिसिंग लिंकवर धबधबा! मुख्यमंत्री फडणवीसांकडून विधानसभेत सरवासारव, निसर्गाला ठरवले जबाबदार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर दरड कोसळली आहे. त्यामुळे या मार्गावरी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पण निसर्गामुळे ही आपत्ती निर्माण झाल्याची सारवासारव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

या दुर्घटनेबद्दल माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निसर्गाच्या बदलत्या स्वरूपामुळे अशा घटना घडत असल्या तरी प्रशासनाकडून कोणतीही तयारी करण्यात आली नव्हती, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. आवश्यक ती सर्व पूर्वतयारी करण्यात आली होती. मात्र, काही वेळा परिस्थिती अपेक्षेपेक्षा अधिक गंभीर स्वरूप धारण करते, असे ते म्हणाले.

फडणवीस यांनी सांगितले की, दरड कोसळताच प्रशासनाने तत्काळ मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक बंद करून दोन्ही बाजूंनी वाहतूक वळवली. पुणे आणि मुंबई या दोन्ही बाजूंनी वाहनचालकांना रस्ता बंद असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे अनेक मोठे अपघात टळले. दरम्यान, रस्त्यावर अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे परत फिरवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरड कोसळलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक लहान वाहने अडकली असून त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. आपत्ती व्यवस्थापन पथके, महानगरपालिका, पोलीस आणि इतर सर्व यंत्रणा घटनास्थळी कार्यरत असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत घडलेल्या घटनांबाबत तसेच शासनाने केलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर निवेदन उद्या सभागृहात केले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Comments are closed.