बेकायदेशीर राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करताना पोलिसांचाच सोनं आणि पैश्यांवर डल्ला, चार पोलीस कर्मचाऱ्यांना अटक

मुंबईत बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या संशयित बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी कारवाई केली होती. पण या कारवाईदरम्यान पोलिसांनीच या बांगलादेशी नागरिकांच्या सोनं आणि पैश्यांवर डल्ला मारला आहे. याप्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्याशी संलग्न असलेले एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि तीन पोलीस शिपाई अटकेत आहेत.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुतार तसेच योगेश खांडगे, नेमाणे आणि पेटकर या तीन शिपायांचा समावेश आहे. हे सर्वजण आरसीएफ पोलीस ठाणे अंतर्गत कार्यरत असलेल्या दहशतवादविरोधी कक्ष (एटीसी) पथकात होते.

ही घटना सुमारे एक महिन्यापूर्वी घडली. शहरात वैध कागदपत्रांशिवाय राहणाऱ्या संशयित बांगलादेशी नागरिकांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान पथकाने एका संशयित बांगलादेशी महिलेच्या घरावर छापा टाकला. त्या छाप्यात घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने उचलण्यात आल्याचा आरोप एका समाजसेविकेने आपल्या तक्रारीत केला आहे. “पोलीस पथक घरात आलं आणि रोख रक्कम तसेच दागिने घेऊन गेलं,” असा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.

या तक्रारीची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशीचे आदेश दिले. चौकशीदरम्यान घटनाक्रमाची पडताळणी, संबंधितांची जबाब नोंद आणि उपलब्ध पुरावे तपासण्यात आले. चौकशीत तक्रारीत तथ्य आढळून आल्यानंतर रविवारी उशिरा चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तात्काळ सर्वांना ताब्यात घेण्यात आले.

सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही घटना मुंबई पोलीस दलातील शिस्त आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याचंही बोललं जात आहे.

Comments are closed.