मुंबईसाठी पुढील 12 तास धोक्याचे; मिठीने धोक्याची पातळी ओलांडली, प्रशासन सतर्क

मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. सखल भागात आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच मिठी नदीही धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. आता मुंबईसाठी पुढील 12 तास धोक्याचे मानले जात आहे. हवामान खात्याकडून पुढील 10 ते 12 तासांसाठी अतिवृष्टीचा इशार देण्यात आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
मुंबईत पहाटेपासून जोरदार बरसणाऱ्या पावसाने जोरदार थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे शहराचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मुंबईतील मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसचे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मुंबईची लोकलसेवा ठप्प झाली आहे. मुंबई महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक भागांमध्ये 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. मुंबईत पुढील 10 ते 12 तास असाच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुंबईची लाईफलाईन लोकलसेवा या पावसामुळे पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुंबईच्या हार्बर आणि मध्य रेल्वेवरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. कुर्ला आणि चुनाभट्टीदरम्यानची लोकल वाहतूक सकाळी ११:२० पासून पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत मध्य रेल्वेची वाहतूकही थांबवण्यात आली आहे. थांबलेल्या ट्रेनमधून प्रवासी खाली उतरून रुळांवरून चालत प्रवास करत आहे. मध्य रेल्वेवरील कुर्ला आणि सायनदरम्यानच्या अप-फास्ट आणि डाउन-फास्ट लोकल सकाळी ११.२५ पासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी ११.४५ पासून स्लो लोकल सेवाही स्थगित करण्यात आली आहे. सध्या अनेक अधिकारी रुळांवरील पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत.
मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पाणी पातळी धोक्याच्या पातळी ओलांडून 3.90 मीटरवर पोहोचली आहे. या पातळीमुळे नदीकाठच्या सखल भागांमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेने (BMC) तात्काळ कारवाई करत कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरसारख्या भागातील सुमारे 400 रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी, जवळच्या शाळेत स्थलांतरित केले आहे. लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफची टीम काम करत आहे.
१४ ऑगस्टपासून मुंबईत 600 मिलिमीटर पाऊस पडला आहे. मंगळवार आणि बुधवारी आणखी तीनशे ते चारशे मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढच्या आठवड्यात आणखी तीनशे ते चारशे मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. दोन आठवड्यात साधारण 1000 मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 12 तास मुंबईसाठी धोक्याचे असून प्रशासनाने नागरिकांना काळझी घेण्याचे आणि अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
Comments are closed.