मुंबई रेशनिंग विभागाची छापेमारी, डोंबिवली एमआयडीसीत 1 हजार 839 बेकायदा गॅस सिलिंडर्स जप्त

एमआयडीसी परिसरात घरगुती व व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा बेकायदेशीरपणे साठा करणाऱ्या गोदामावर मुंबईच्या रेशनिंग विभागाने छापेमारी केली. या कारवाईत पथकाने विविध कंपन्यांचे 1 हजार 839 घरगुती व व्यावसायिक वापराचे एलपीजी सिलिंडर व सात वाहने असा एकूण 67 लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मुंबई रेशनिंग विभागाचे दक्षता पथक गस्तीवर असताना एमआयडीसी फेस 2 मधील पिंपळेश्वर महादेव मंदिराजवळ बंद वाहनांमध्ये बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडर भरलेले आढळून आले. तसेच वाहने उभी असलेल्या गोदामातदेखील मोठ्या प्रमाणावर गॅस सिलिंडरचा साठा केल्याचे पथकाच्या निदर्शनात आले. त्यानुसार पथकाने गोदामांची झडती घेऊन विचारणा केली असता त्यांच्याकडे विस्फोटक विभाग, अग्निशमन विभाग किंवा संबंधित गॅस कंपन्यांची कोणतीही परवानगी अथवा कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. संबंधित गोदाम चालक कोणत्याही विभागाची अधिकृत परवानगी न घेता खुल्या जागेत गॅस सिलिंडरची साठवणूक व विक्री करत असल्याचे उघड झाले.

एजन्सी मालकावर गुन्हा दाखल

नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई कार्यालयाच्या फिरत्या पथकातील शिधावाटप अधिकारी दीपक डोळस, निरीक्षक रामराजे भोसले, चंद्रकांत कांबळे, राजेश सोरते, विकास नागदिवे, देवानंद थोरवे, पवन कुंभले, रवींद्र राठोड या पथकाने ही कारवाई केली. या पथकाने एजन्सी मालक व गोदाम चालकाविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Comments are closed.