खड्डा पडला, पाणी तुंबले, कचरा साचला, अतिक्रमण, पाणी नाहीय? ‘मायबीएमसी मार्ग’वर 114 प्रकारच्या तक्रारींचा निपटारा
खड्डा पडला, पाणी तुंबले, कचरा साचला, अतिक्रमण झाले, पाणी आले नाही अशा प्रकारच्या तब्बल 114 प्रकारच्या समस्या पालिकेकडून ताबडतोब सोडवण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेने ‘मायबीएमसी मार्ग’ अॅप सुरू केले आहे. यासाठी मुंबईकरांना ‘मायबीएमसी मार्ग’ अॅपवर तक्रार करावी लागणार आहे.
पावसाळ्यात मुंबईकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यासाठी पालिकेने कम्प्लेंट मॅनेजमेंट अँड रेडरेस्सल सिस्टम म्हणजेच ‘मायबीएमसी मार्ग’ अॅप सुरू केले आहे. गतवर्षी रस्त्यांवरील खड्डय़ांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी पालिकेने ‘पॉटहोल क्विकफिक्स’ हे स्वतंत्र मोबाईल अॅप्लिकेशन सुरू केले होते. यावर खड्डय़ाचा फोटो आणि ठिकाण पाठवल्यास तातडीने खड्डा बुजवला जात. मात्र नागरिकांना महापालिकेच्या विविध विभागांशी संबंधित तक्रारींसाठी वेगवेगळ्या प्रणालींचा वापर करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने यंदाच्या वर्षी ‘मायबीएमसी मार्ग’ ही सर्वसमावेशक प्रणाली सुरू केली आहे. त्यात ‘पॉटहोल क्विकफिक्स’ अॅपचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता नागरिकांना रस्त्यांवरील खड्डे, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी समस्या, पाणीपुरवठा, रस्ते देखभाल, उद्याने, सार्वजनिक आरोग्य, कीटक नियंत्रण, अतिक्रमण, प्रकाशयोजना यांसह विविध विभागांशी संबंधित एकूण 114 प्रकारच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा एकाच अ@पवर उपलब्ध झाली आहे.
तक्रारीची कार्यवाही प्रत्येक टप्प्यावर समजणार
‘मायबीएमसी मार्ग’ प्रणालीचे वैशिष्टय़ म्हणजे नागरिकांना एकाच व्यासपीठावरून तक्रार नोंदविणे, संबंधित छायाचित्रे अपलोड करणे, तक्रारीची सद्यस्थिती तपासणे, संबंधित विभागाकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती घेणे आणि तक्रार निकाली निघाल्यानंतर त्याबाबतची माहिती प्राप्त करणे शक्य होते. त्यामुळे तक्रार नोंदणीपासून निवारणापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. वापरकर्त्यांना मोबाईलवरील प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येणार आहे.
Comments are closed.